भगव्या झेंड्याखाली आणि तिरंग्याखाली एकत्रित येणे ही काळाची गरज!

14 Jan 2025 16:09:38
 
Fadanvis
 
पानिपत : ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याखाली आम्हाला एकत्रित आणले त्याचप्रमाणे आज भगव्या झेंड्याखाली आणि तिरंग्याखाली एकत्रित येणे ही काळाची गरज आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मंगळवार, १४ जानेवारी रोजी त्यांनी पानिपत येथे '२६४ व्या शौर्य दिवस समारंभा'त उपस्थित झाले होते. तसेच त्यांनी पानिपत शौर्य स्मारकासही भेट दिली.
 
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पानिपत ही मराठी माणसाची एक भळभळती जखम आहे. पण त्याचवेळी पानिपत मराठी माणसाचा अभिमानदेखील आहे. ज्याप्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात शौर्य दाखवले, अतिशय विपरित परिस्थितीत ते लढले ही युद्धाच्या इतिहासातील मोठी गोष्ट आहे. या शौर्यानंतर अनेक मराठे सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्यानंतरही मराठ्यांनी कधीही हार मानली नाही. त्यानंतर दहा वर्षात पुन्हा संपूर्ण भारतावर मराठ्यांनी भगवे राज्य प्रस्थापित केले आणि दिल्ली जिंकून दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याला संपूर्ण भारतात पसरवण्याचे काम आमच्या मराठ्यांनी केले. पानिपतच्या लढाईत तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला तरी मराठे कधीच हरले नाहीत. त्यानंतर भारतावर आक्रमण करण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  वाल्मिक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक!
 
"छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात अठरापगड जातीचे लोक मावळे म्हणून एकत्रितपणे लढले. जोपर्यंत आम्ही एकत्रित आहोत तरच सुरक्षित आहोत, हे लक्षात राहिल तोपर्यंत आमची प्रगती होत राहील. पण आम्ही पुन्हा जातीपातींच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विभाजित झालो तर कदाचित आम्हाला प्रगती करता येणार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याखाली आम्हाला एकत्रित आणले तसेच आज भगव्या झेंड्याखाली आणि तिरंग्याखाली एकत्रित येणे ही काळाची गरज आहे," असेही ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "इथला परिसर आणि स्मारकाला अधिक चांगले करण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज पडेल त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेऊन पूर्ण करेल. या मंगलभूमिला वंदन करण्यासाठी येण्याची संधी मला मिळणे हे माझे सौभाग्य आहे. यापुढेसुद्धा जेव्हा मला इथे येण्याची संधी मिळेल तेव्हा मी येतच राहील," अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0