निवडणुकांचा मौसम आला की ‘इंडी’ आघाडीच्या तोंडदेखल्या एकतेला आणखीन तडे जातात. तसाच अपेक्षित प्रकार आता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही समोर आला असून, ‘आप’ आणि काँग्रेस हे पक्ष निवडणुका स्वतंत्र लढविणार आहेत. तसेच ‘एकला चलो रे’चे वारे बिहारमध्येही वाहू लागले आहेत. त्यामुळे ‘इंडी’ आघाडीचा पोपट अखेरीस मेला का, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राजधानी दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दिल्लीत दि. ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होईल आणि दि. ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये (आप) आघाडी नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवताना दिसत आहेत, तर लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष ‘इंडी’ आघाडीचा भाग होते. केवळ ‘आप’च नव्हे, तर ‘इंडी’ आघाडीतील राष्ट्रीय जनता दल (राजद), समाजवादी पक्ष (सपा), तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना-उबाठा यांनीदेखील काँग्रेसऐवजी ‘आप’ला पाठिंबा दिला आहे. उबाठाचे नेते संजय राऊत यांनी तर गुरुवारी सकाळीच जे दिल्लीत घडले ते मुंबईतदेखील घडू शकते, असे सांगून मुंबई महानगरपालिका निवडणूक उबाठा एकट्यानेच लढणार असल्याचे संकेत देऊन टाकले आहेत. या सर्व प्रकाराला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला चांगलेच वैतागले आणि त्यांनी गुरुवारी ‘आप’ आणि काँग्रेसमधील सुरू असलेल्या संघर्षावर निशाणा साधला आहे आणि ‘इंडी’ आघाडीचा पोपट मेला असल्याचे अधिकृत घोषणा करण्याचा सल्ला दिला आहे.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “दिल्लीत काय चालले आहे, याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. दिल्ली निवडणुकीशी आमचा काहीही संबंध नाही. मला आठवते तोपर्यंत, ‘इंडी’ आघाडीसाठी विशिष्ट अशी कोणतीही कालमर्यादा नव्हती. सध्या मात्र ‘इंडी’ आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे सध्या या आघाडीचे नेतृत्व, अजेंडा आणि अस्तित्व याविषयी कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच होती, तर ती आताच संपवायला ही,” असे मत अब्दुल्ला यांनी मांडले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीविषयीदेखील अब्दुल्ला यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, “आमचा दिल्ली निवडणुकीशी काहीही संबंध नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत लढणार्या राजकीय पक्षांनी भाजपशी कसे लढायचे, हे ठरवावे. याआधी ‘आप’ सलग दोनवेळा तेथे यशस्वी झाली आहे. त्यामुळे दिल्लीचे लोक यावेळी काय निर्णय घेतात, हे पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल.” मात्र, हे म्हणतानाही अब्दुल्ला यांनी “आप’ आणि काँग्रेसने एकत्र यायला हवे,” असे मत मांडलेले नाही. त्यामुळे अब्दुल्ला यांनादेखील आता ‘इंडी’ आघाडीची अडचणच झाल्याचे दिसते.
अशाप्रकारे ‘इंडी’ आघाडी एका झटक्यात विघटित झाली. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिल्यानंतर आणि हरियाणा-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून पराभव पत्करल्यानंतरच ‘इंडी’ आघाडीचे भवितव्य संपले असल्याचे दिसू लागले होते. बंधारे सर्वप्रथम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले. त्यानंतर एकामागून एक राजदप्रमुख लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उबाठाचे उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नेतृत्व करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. ‘आप’ने तर काँग्रेसलाच ‘इंडी’ आघाडीतून हुसकावून लावण्याची घोषणा केली आहे. आता, लालू यादव यांचे पुत्र आणि बिहारमध्ये महाआघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तेजस्वी यादव यांनी ‘इंडी’ आघाडीचा अंत जाहीर करून ‘इंडी’ आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच असल्याचे सांगितले आहे.
दिल्लीत ‘आप’ने काँग्रेसला कोणतेही महत्त्व दिले नाही. कारण, दिल्ली या आपल्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला येऊ देण्यास ‘आप’ची तयारी नाही. त्याचवेळी हरियाणात काँग्रेसने ‘आप’ला ज्या पद्धतीने अपमानित केले, त्याचा बदला ‘आप’ने घेतला आहे. बिहारमध्येही राजद गेल्यावेळीप्रमाणे काँग्रेसला महत्त्व देण्याच्या मनःस्थितीत नाही. २०२० साली काँग्रेसने राजदकडून ७० जागा घेतल्या होत्या. परंतु, त्यांना फक्त १९ जागा जिंकता आल्या. तेजस्वी यादव आणि लालू यादव यांना अजूनही पश्चात्ताप आहे की, जर काँग्रेसला इतक्या जागा मिळाल्या नसत्या, तर तेजस्वी कदाचित मुख्यमंत्री झाले असते. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत ही संधी लालूंना गमवायची नाही.
त्यासाठीच राजदप्रमुख लालू यादव यांनी दि. १८ जानेवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. राहुल गांधीही त्याचदिवशी पाटण्याला येत आहेत. ते काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतील. कदाचित तेजस्वी यांना काँग्रेस आपल्या वाढीव जागांच्या मागणीवर ठाम राहण्याचा हेतू असल्याची माहिती मिळाली असावी. त्याचवेळी काँग्रेसलाही ते राजदचा छोटा भाऊ असल्याची आपली प्रतिमा सुधारण्याची गरज आहेच. कारण, १९९० सालापासून बिहारमध्ये राजदच्या पाठिंब्याने काँग्रेस सत्तेत आहे. जागांच्या मुद्द्यावर राहुल गांधींना तोंड उघडण्यापासून रोखण्यासाठी, तेजस्वी यांनी त्यांच्या विधानाने त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे अगदीच शांत बसले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘इंडी’ आघाडीचा झेंडा हाती घेऊन राहुल गांधी उत्साहात फिरत होते. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आणि राहुल गांधी-काँग्रेस त्यामध्ये खुश झाले आहेत. कारण, ९९ जागा काही होईना, त्यामुळे राहुल गांधी यांचे नेतृत्व पुन्हा प्रस्थापित झाल्याचा समज काँग्रेसने करून घेतला आहे. त्याचवेळी प्रादेशिक पक्षांवर हुकूमत गाजवण्याची काँग्रेसची सवय आहे. मात्र, ‘इंडी’ आघाडीमध्ये तर प्रादेशिक पक्षच काँग्रेसला गुंडाळण्याची भाषा करू लागले आहेत. कोणताही राष्ट्रीय पक्ष, भले तो कमकुवत का असेना, प्रादेशिक पक्षांची दादागिरी सहन करणार नाही. त्यामुळेच काँग्रेसनेही आता ‘इंडी’ आघाडीकडे दुर्लक्ष करण्याचेच धोरण ठेवले आहे.
देशात २०१९ सालापासून भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावेळी म्हणजे २०१८-२०१९ साली पहिल्यांदाच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (तेदेपा) नेते चंद्राबाबू नायडू यांनी भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर ते रालोआबाहेर पडले. २०२१ साली बंगाल जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी दुसर्यांदा प्रयत्न केला. निराश झाल्यानंतर दोघेही गप्प राहिले. तिसरा प्रयत्न बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाआघाडीत असताना केला. त्यांना नक्कीच यश मिळाले. पण, २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते वेगळे झाले. त्यांनी पुन्हा भाजपसोबत जाणे पसंत केले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही ‘इंडी’ बहुमतापासून दूर राहिली. त्यानंतर आता या आघाडीतील सर्वच प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसला दूर ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच आता ‘इंडी’ आघाडीचा पोपट मेलाच असून, त्याची अधिकृत घोषणाच तेवढी बाकी असल्याचे दिसते.