जगात जे जे म्हणून अवैध असेल, ते ते सारे काही एकाच ठिकाणी पाहावयास मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे पाकिस्तान! आत्मप्रौढीपणात मश्गुल राहण्याची सवय लागलेला पाकिस्तान, वास्तवाकडे उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू शकला नाही आणि त्याचीच परिणीती म्हणजे या देशाचे आजचे ज्वलंत वास्तव.
कोणाच्या परिस्थितीवर हसण्याचा करंटेपणा करण्याइतकी विवेकहीनता भारतीयांमध्ये नसली, तरीही पाकिस्तानचे वास्तव हा त्यांच्या भूतकाळातील निर्णयांचाच परिपाक म्हणावा लागेल. मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठीही पाकिस्तानमधील लोकांना झगडावे लागते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्ण पदकानंतर तर पाकिस्तानातील वैचारिक गरिबीचे दर्शन तिकडच्या राजकारण्यांनी दाखवलेच. आता त्यावरही पाकी जनतेने शिक्कामोर्तब केले आहे.
तर घटना अशी घडली की, पाकिस्तानातील कराची इथे ‘ड्रीम बाझार’ या नव्या मॉलचे नुकतेच उद्घाटन झाले. त्यामध्ये पाकिस्तानातील काही मोठ्या ब्रॅण्डचे दागिने, कपडे यांची दुकाने नव्याने सुरु झाली होती. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्या दुकानांच्या मालकाने काही सवलतींची घोषणादेखील केली. अर्थात दुकानदाराची अपेक्षा साहजिकच त्याचा खप वाढवून नफा कमावण्याचा होता. मात्र, त्याच्या पदरी घोर निराशाच आली. कारण, या दुकानातून खरेदी करण्यासाठी उसळलेल्या बेशिस्त गर्दीने तो मॉलच लूटण्याची किमया लीलया साधली. त्यामुळे नफा झाला नसला तरी, सगळा माल खपवण्याचे दुकानदाराचे स्वप्न पाकिस्तानी जनतेने पूर्ण करून दाखवलेच म्हणायचे. मुळातच चोरी करणे, लूटणे हे पाकिस्तानसाठी काही नवीन नाही. पाकिस्तानी यात वाकबगार.
याआधीही सौदी अरेबिया, अमिरातीमध्ये असलेले पाकिस्तानी नागरिक तिथेही जाऊन पाकिस्तानातील या ‘चौर्यसंस्कृती”चा परिचय देतच असतात. यांची ही कला सौदी आणि अमिरातीमध्ये इतकी फोफावली की शेवटी ‘असे कलाकार आमच्याकडे पाठवूच नका,’ असे सांगण्याची वेळ या दोन देशांवर आली. खरे पाहता, पाकिस्तानी सरकारदेखील या सगळ्या प्रकाराने त्रस्त आहेच. पण, सगळेच चोर असल्याने कायदा कोण कोणाला सांगणार?
देशात कायदा- सुव्यवस्था नाही, यामागे सरकारी कर्मचारी बेजबाबदार आहेत, हे सिद्ध होते. देशात दाखवायला तरी कायद्याचे राज्य असायला हवे, त्यामुळे सरकार काही ठोस भूमिका घेण्याची ताकद आणि इच्छाशक्ती आहे, असे किमान जगाला भासवू शकतो, असे चिंतन करून, अखेर पाकिस्तानी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. पाकिस्तानी सरकारने एक नवा फतवा जारी करून सरकारी कर्मचार्यांनी समाजमाध्यमांचा वापर करताना पाकिस्तान सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कर्मचारी कामावर लक्ष देतील आणि आपली जबाबदारी चोख पार पाडतील, तसेच महत्त्वपूर्ण गुप्त माहिती सार्वजनिक होण्याचा धोका पूर्णपणे टळेल, असा पाकिस्तानी सरकारचा कयास.
त्यामुळे हा निर्णय योग्य की अयोग्य, यात न पडता पाकिस्तानच्या सरकारी कर्मचार्यांना समाजमाध्यमांचा वापर करताना आता परवानगी घ्यावी लागणार, हे निश्चित! अर्थात, हे नियम करून साध्य काय होणार, हा दूरचा विषय आहे. कारण, पाकिस्तानातील अधिकारीच भ्रष्ट किंवा विकले गेले आहेत, असे म्हणणे काहीसे एकांगी होईल. पाकिस्तानातील भ्रष्टाचार, तेथील नेत्यांची असलेली योग्यता यांबाबत आंतरराष्ट्रीय मत काय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच. आज कोणताही पाकिस्तानी नागरिक अभिमानाने तो पाकिस्तानी असल्याचे जगात सांगू शकत नाही. त्यामुळेच ‘थोडेसे पैसे देऊन हवा तसा वापरता येणारा देश’ हीच आज पाकिस्तानची अवस्था झाली आहे. या देशातील विचारसरणीने ना पाकिस्तानला समृद्ध केले, ना तेथील जनता सुखी झाली.
आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांनंतरही पाकिस्तानातील जनतेची ना आर्थिक परिस्थिती बदलली, ना लूटमार करण्याची प्राचीन पद्धत. असे हे एकीकडे लूटीतून बेबंदशाहीचे आणि दुसरीकडे सोशल मीडियावरील निर्बंधांचे चित्र. “ज्या 75 वर्षार्ंत भारत महाशक्ती होण्याकडे वाटचाल करत असताना, आपण प्रत्येक देशासमोर भिकेसाठी आपली फाटकी झोळी पसरवत आहोत, याची लाज वाटली पाहिजे,” असे उद्गार पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते मौलान फजलुर रेहमान यांनी काढले होते, ते काहीसे खरेच म्हणावे लागतील.