मुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांकडून दंगलींबाबत होत असलेल्या सततच्या वक्तव्यांमुळे मविआचं दंगली घडवण्याचं कट-कारस्थान तर नाही ना? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच दंगलीचे भाकीत करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवाऱ साहेबांनी 'महाराष्ट्राचा मणिपूर होईल' असे भाकीत केले. त्या पाठोपाठ दोन दिवसांपूर्वी 'उबाठा'चे चंद्रकांत खैरे यांनी दंगली पेटवण्याचा आदेश दिला आणि आता हे रडतरौत सर्वज्ञानी संजय राऊत दंगलीची भाषा बोलत आहेत. हा नक्कीच योगायोग नाही, काहीतरी विपरीत कारस्थान शिजवले जात आहे, असे दिसते. महाराष्ट्रातील राजकीय आंदोलने, जातीजातीत वाढवले जाणारे तेढ, 'महायुती' सरकारच्या प्रत्येक निर्णयाला होणारा तीव्र विरोध आणि त्यातून होणारी आंदोलने, जाळपोळ किंवा हिंसाचार हे कशाचे द्योतक आहे?" असा सवाल त्यांनी केला.
हे वाचलंत का? - प्रवाशांची गैरसोय होईल असं कृत्य करू नये! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आवाहन
त्या पुढे म्हणाल्या की, "दंगली घडवण्याची स्वप्नं पाहणाऱ्या या बिघाडीच्या महा बिघडलेल्या, सत्तेसाठी हपापलेल्या आणि देव पाण्यात घालून बसलेल्या महाराष्ट्रद्रोही नेत्यांना एकच सांगणे आहे, राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचे 'महायुती' सरकार अगदी भक्कम आहे. दंगली घडवण्याचे तुमचे कारस्थान हमखास उधळून लावले जाईल, याची खात्री बाळगा," असे त्या म्हणाल्या. तसेच असे दंगलीचे भाकीत करणाऱ्या नतद्रष्टांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावे आणि त्यांना पुरावे मागावेत, अशी मागणीही त्यांनी गृहमंत्र्यांना केली आहे.