'वापरा आणि फेका' यात उद्धव ठाकरेंची पीएचडी! आमदार नितेश राणेंची टीका

    25-Sep-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
मुंबई : वापरा आणि फेका यात उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. वापरा आणि फेका हा भाजपचा इतिहास असून अजित पवारांपासून याची सुरुवात झाली आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. यावर राणेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "अजित दादांना कोणी वापरलं आणि कोणी फेकलं हे जेव्हा त्यांच्या तोंडून ऐकतील तेव्हाच संजय राऊतांना कळेल. वापरा आणि फेका मध्ये उद्धव ठाकरेंनीच पीएचडी केली आहे. त्यांनी स्वत:च्या रक्ताच्या भावाला वापरलं आणि फेकलं. स्वत:च्या चुलत भावालाही वापरलं आणि फेकलं. म्हणूनच आज ठाकरे कुटुंब एकसंघ राहू शकलेलं नाही. एकनाथ शिंदे, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक या सर्वांना तुमच्या मालकाने वापरलं आणि फेकलं. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "जेव्हा जेव्हा गुन्हेगारांना शिक्षा झाली तेव्हा काँग्रेसला..."; भाजपचा घणाघात
 
"भाजप आणि महायूतीचं सरकार हे पुन्हा एकदा ताकदीने महाराष्ट्रात येणार आहे. आमच्या विजय मिरवणूकीमध्ये संजय राऊतसुद्धा नाचताना दिसतील. कारण त्यांनासुद्धा मनातून परत महायूतीचं आणि हिंदूंचं सरकार यावं, हेच वाटतंय," असा टोलाही त्यांनी लगावला.
 
महाराष्ट्र पोलिसांवर हेच का तुमचं प्रेम?
  
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "गुन्हेगाराने पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्यात पोलिसांचा जीव जावा, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतं का? पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी जर कारवाई केली तर त्यात चूक काय? महाराष्ट्र पोलिसांवर तुमचं एवढंच प्रेम आहे का? इतर वेळी त्यांच्या नावाने का खडी फोडत बसता? उद्या त्यांच्या श्रद्धांजलीला येऊन अभिवादन करण्याची ईच्छा मविआच्या नेत्यांची होती का? अक्षय शिंदे हा काही मोठा संत आणि महात्मा होता का? त्याने ज्या चिमुकलींवर अत्याचार केला त्यांच्याबद्दल थोडा विचार करा आणि मग त्याची बाजू घ्या," असेही ते म्हणाले.