"आम्ही मोठे भाऊ आहोत असं वाटत असेल तर..."; संजय राऊतांचा काँग्रेसला घरचा आहेर

20 Sep 2024 12:37:31
 
Raut
 
मुंबई : कुणाला आम्ही मोठे भाऊ आहोत असं वाटत असेल तर त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे? हे लक्षात घ्यावं, असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जागावाटपावर भाष्य केलं.
 
संजय राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ, मोठा भाऊ असं काहीही नाही. तीन प्रमुख पक्ष एकत्र निवडणूका लढवू. लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ असं कुणाला वाटत असेल तर महाराष्ट्रात काय चित्र आहे हे भविष्यात कळेल. काँग्रेस पक्षाला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कुणाला आम्ही मोठे भाऊ आहोत असं वाटत असेल तर त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे? हे त्यांनी लक्षात घ्यावं. कोल्हापूर, रामटेक, अमरावतीची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली. या तीन जागा शिवसेनेमुळे वाढल्या आहेत. ते जर हे विसरले असतील तर योग्य नाही. पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा भूमिका कधी घेणार नाहीत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "लोकसभेमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असला तरी..."; संजय राऊतांचं विधान
 
ते पुढे म्हणाले की, "ज्यापद्धतीने लोकसभेला तिन्ही पक्ष एकत्र लढले त्याच पद्धतीने विधानसभेलासुद्धा एकत्र लढतील. लोकसभेला केवळ ४८ जागांवर चर्चा करायची असल्याने जागावाटप अधिक सोपं होतं. पण विधानसभेला २८८ जागा आहे. तीन प्रमुख पक्ष आणि आमचे काही लहान मित्रपक्ष आहेत. या सगळ्यांना सांभाळून घेण्याची आमची भूमिका आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0