मुंबई : बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाविकास आघाडीसोबत यावं, असं आवाहन शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि स्वराज्य संघटनेचे छत्रपती संभाजीराजे हे राज्यात तिसरी आघाडी तयार करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबद्दल बोलताना जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील म्हणाले की, "बच्चू कडूंनी महाविकास आघाडीत यावं अशी आमची त्यांना सूचना राहील. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आम्ही एक आघाडी तयार केली आहे. त्यांच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोकं उभे राहतात का? हे बघण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना साधनसंपत्ती देण्याचीही तयारी आहे. पण बच्चू कडू किंवा त्यांचे सहकारी अशा कोणत्याही गोष्टीला बळी पडणार नाहीत, असा मला विश्वास आहे."
हे वाचलंत का? - सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
"बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. पण महाराष्ट्रात भाजपला अप्रत्यक्ष मदत होणार नाही, याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील अशी अपेक्षा आहे," असे ते म्हणाले. दरम्यान, आता बच्चू कडू जयंत पाटलांची ही ऑफर स्विकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.