पुणे : आपण केलेल्या कामाची लोकांना वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते. न सांगता काम केलं तर लोकांना त्याची किंमतच राहात नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. 'दादांचा अर्थसंकल्प विकासाचा' या गौरवांकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मी इतके वर्ष काम करत आहे. परंतू, त्या कामाची कधी कधी आठवण करून दिली नाही तर लोकांना त्याची किंमत राहत नाही. मी लोकसभेला याचा अनुभव घेतला आहे. आम्ही हे दिलंय, हे केलंय हे सारखं लोकांच्या मनात बिंबवावं लागतं. न सांगता काम केलं तर लोकांना त्याची किंमतच राहात नाही."
हे वाचलंत का? - जागावाटपासंदर्भात पुढचे तीन दिवस मविआची बैठक : संजय राऊत
"राज्यात फिरत असताना मला अनेक आमदार सांगतात की, दादा आम्हाला अडीच हजार कोटी मिळाले, तीन हजार कोटी मिळाले. पण बारामतीकरांना त्यांच्यापेक्षाही जास्त पैसे मिळाले आहेत, मात्र त्यांना समाधान नाही. त्यामुळे कधीकधी काम करणारा माणूसही नाऊमेद होतो. एवढं सगळं करूनही किंमत राहात नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, "प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण मी राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. आपल्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये यासाठी मी माझी भूमिका मांडत असतो. द्यायचं असल्यास कितीही दिलं तरी लोकांना कमीच वाटतं," असेही ते म्हणाले. तसेच हा गौरवांक प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.