मुंबई : गेली २५ वर्षे कोस्टल रोड संदर्भात केवळ चर्चा व्हायची. पण मोदी सरकार आल्यानंतर केवळ ५ बैठकांनंतर महायूती सरकारने हे काम पूर्णत्वास नेलं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. गुरुवारी वांद्रे-वरळी सेतुला जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेली २५ वर्षे कोस्टल रोड संदर्भात केवळ चर्चा व्हायची. देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मुख्यमंत्री दिल्लीत जायचे आणि हात हालवत परत यायचे. पण त्यांना कधीही परवानगी मिळाली नाही. मोदी सरकार आल्यानंतर मी स्वत: प्रयत्न केले आणि सगळ्या परवानग्या मिळाल्या," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - भाग्यश्री आत्राम शरद पवार गटात दाखल!
ते पुढे म्हणाले की, " त्यानंतर त्यावेळी मित्रपक्ष असलेल्या उद्धवजींच्या आग्रहास्तव महानगरपालिकेला हे काम दिलं. पुढे मध्यंतरी या कामाची काय परिस्थिती होती, हे सर्वांनी बघितलं. पण पुन्हा नव्याने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचे सरकार आल्यानंतर ज्या वेगाने आम्ही हे काम केलं ते आज सर्वांपुढे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे काम महायूती सरकारनेच पूर्ण केलं आहे," असेही ते म्हणाले.