गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी गडचिरोलीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. दरम्यान, आता धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाग्यश्री आत्राम यांना शरद पवार गटाकडून अहेरी विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप विरुद्ध लेक यांच्यात सामना रंगणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
याप्रसंगी बोलताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, "या क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. येथील रस्त्यांची परिस्थिती खूप खराब आहे. शेतकरी, महिला आणि आदिवासींच्या प्रश्नावर बोलायला आमच्या मंत्र्यांकडे वेळ नाही. ते फक्त येतात आणि निघून जातात. त्यांनी मला या विधानसभा क्षेत्रात फिरवलं आणि मला गाजर दाखवलं," अशी टीका त्यांनी यावेळी केली.