नरिमन पॉईंट ते वांद्रे अंतर अवघ्या १० मिनिटांत! वांद्रे-वरळी सेतुला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण संपन्न
12-Sep-2024
Total Views | 77
मुंबई : वांद्रे-वरळी सेतुला जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. या पुलामुळे नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे. या पुलाची लांबी १३६ मीटर असून रुंदी १८ मीटर एवढी आहे. तर उंची २९.५ मीटर एवढी आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "या पुलाची बांधणी करताना कोळी बांधवांनी दोन खांबातील रूंदी जास्त ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार पुलाच्या संरचनेत बदल करून ही लांबी वाढवण्यात आली. मुंबई सागरी किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू एकमेकांना जोडणे हा या प्रकल्पाचा अत्यंत महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळेची, इंधनाची बचत होणार असून कोणत्याही सिग्नलवर न थांबता थेट प्रवास करता येणे शक्य होणार आहे," असे त्यांनी सांगितले.