महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदावरुन खडाजंगी!

09 Aug 2024 13:07:07
 
MVA
 
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सध्या गोंधळ सुरु असून मविआच्या नेत्यांमध्ये याबाबत एकवाक्यता दिसत नाही. दरम्यान, आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि उबाठाचे नेते संजय राऊत या दोघांनीही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर भाष्य केलं.
 
उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले असता त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी संवाद साधला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारले असता ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. पण विरोधी पक्ष म्हणून निवडणूकीला सामोरं जात असताना चेहरा पुढे ठेवत नाही, अशी महाराष्ट्रात परंपरा आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढणार आहोत आणि सत्तेत आल्यावर तो जाहीरनामा पूर्ण करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी मान्यता मिळेल असं मला वाटत नाही. निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळतं, अशी परंपरा आहे. कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री करायचं हे त्या पक्षातील नेते ठरवतात. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  'हर घर तिरंगा अभियान' आता लोकचळवळ बनलीये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
विरोधी पक्षाकडे चेहरा गरजेचाच!
 
पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, "पृथ्वीराज चव्हाणांचं एखादं मत असू शकतं. पण आम्ही दिल्लीत चर्चा केल्यानंतर नक्कीच महाविकास आघाडीमध्ये काही वेगळ्या गोष्टी ठरल्या आहे. पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. जर लोकसभा निवडणूकीत राहूल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहरा झाले असते तर नक्कीच अनेक जागांवर भाजपचा पराभव करु शकलो असतो, असं आम्ही वारंवार सांगितलं. निवडणूकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांकडे चेहरा असावा लागतो," असे ते म्हणाले. त्यामुळे मविआच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0