जालना : महाराष्ट्रात बांग्लादेशसारखं काहीही होणार नाही, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं आहे. बांगलादेशमध्ये सध्या अस्थिर वातावरण असून तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. तसेच बांग्लादेशमध्ये होत असलेल्या हिंसाचारामुळे शेख हसीना यांनी देश सोडला आहे. दरम्यान, यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे म्हणाले की, "ज्यांना झळा पोहोचतात त्यांनाच आरक्षण म्हणजे काय हे माहिती असतं. ज्यांचा मुलगा एका टक्क्याने मागे पडतो त्याला आरक्षणाची किंमत माहिती असते. जे जनतेच्या जीवावर मोठे झालेत, ज्यांना मराठ्यांमुळे एसीमध्ये बसायला मिळालं त्यांना आरक्षणाची किंमत कळणार नाही. त्यांना गोरगरिबाच्या वेदना कळणार नाहीत. त्यासाठी गोरगरिबांच्या वेदना जाणून घ्याव्या लागतात."
हे वाचलंत का? - मराठा आणि कुणबी दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल
"आरक्षणाच्या मुद्यावर बांग्लादेशमध्ये काहीही झालं असलं तरी महाराष्ट्रात असं होणार नाही. पण आरक्षणाचा आक्रोश किती भयानक असतो, हे समजून घेतलं पाहिजे. यातून सरकारने धडा घेतला तर बरं होईल. आरक्षण हा साधासोपा विषय नाही. यात लोकांच्या भयानक वेदना आहेत. पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही. कारण महाराष्ट्र हा आमचा आहे. तो सर्व जाती धर्माचा आहे. इथे सगळी शांतात राहाणार असून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही," असेही ते म्हणाले.