मुंबई : राज्यभरात आज ठिकठिकाणी दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यातच मुंबईतील वरळीमध्ये दहिहंडी महोत्सवादरम्यान एक अनोखा देखावा तयार करण्यात आला आहे. वरळीमध्ये भाजपच्या दहीहंडीमध्ये अफजल खानाच्या वधाचे नाट्य साजरे करण्यात आले. या नाट्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
मुंबईतील वेगवेगळ्या भागात आज दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे सेलिब्रिटी आणि नेते येऊन दहिहंडीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. अशातच संतोष पांडे यांच्याद्वारे वरळीतील जांबोरी मैदानात आयोजित 'परिवर्तन दहीहंडी उत्सव' हजारो गोविंदांसह मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अफजल खानाच्या वधाचे नाट्य साजरे करण्यात आले.
लोकशाही पद्धतीने अफजल खानरूपी शक्तींचा कोथळा बाहेर काढू!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा देखावा साजरा करण्यात आला. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "इतकी थरं लावून अफजल खानाच्या वधाचा देखावा पाहून आमच्या अंगावरही काटा उभा राहिला. स्वराज्यावर अफजल खानरूपी कितीही शक्ती चालून आल्या तरी छत्रपतींच्या प्रेरणेने आम्ही त्यांचा कोथळा लोकशाही पद्धतीने बाहेर काढू, हेच यातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे," असे ते म्हणाले.