यंदा राज्याला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे यजमानपद; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
दि.०३ ते ०४ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परिषदेत विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरविणे यावर चर्चा
26-Aug-2024
Total Views |
मुंबई : २७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह सुशासन उपविभाग सामान्य प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "२७ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२४" दि. ३ व ४ सप्टेंबर, २०२४ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
सु-प्रशासन तसेच ई- गव्हर्नन्ससाठीच्या उत्कृष्ट संकल्पनांचे आदान-प्रदान होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय सुधारणा, रचना व कार्यपद्धती या उपविभागाच्या नवीन नावांची घोषणादेखील या परिषदेत केली जाणार आहे. शासकीय, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील व्याख्याते आणि पुरस्कार विजेते भाग घेणार असून नावीन्यपूर्ण ई-प्रशासन पद्धतींवर चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे. दरम्यान, पुरस्कार विजेते, व्याख्याते आणि इतर सहभागींसाठी nceg.gov.in या पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे.
ही परिषद देशातील सर्वात मोठ्या सभागृहांपैकी एक असलेल्या जस्मीन हॉलमध्ये होणार आहे. परिषदेचे यजमानपद यंदा महाराष्ट्र राज्याकडे असून "विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरविणे" हा या परिषदेचा विषय आहे. या परिषदेस प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या समारोप कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा हेही उपस्थित राहणार आहेत.