विदर्भात मनसेचे दोन उमेदवार जाहीर!

23 Aug 2024 12:22:57
 
Raj Thackeray
 
चंद्रपूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेने महाराष्ट्रभर नवनिर्माण यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा सध्या विदर्भात पोहोचली असून मनसेने गुरुवारी विदर्भातील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांनी चंद्रपूर आणि राजूरा विधानसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यानुसार चंद्रपूर विधानसभेत मनदिप रोडे तर राजूरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेने याबद्दलचे एक परिपत्रकही जारी केले आहे.
 
हे वाचलंत का? -  धक्कादायक! अकोल्यात १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
 
याआधी मनसेने शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर, पंढपूर विधानसभेसाठी दिलीप धोत्रे तर लातूर ग्रामीणमध्ये संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता चंद्रपूरमध्ये मनदिप रोडे आणि राजूरामध्ये सचिन भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली असून यावेळी राज्यभरात २५० जागा लढविण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0