कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! बोरिवलीतून दररोज सुटणार कोकण रेल्वेची गाडी!

17 Aug 2024 12:51:03
 
Sunil Rane
 
मुंबई : कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. बोरिवलीतून कोकण रेल्वे सुरु होणार असून कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात कोकणासाठी बोरिवलीतून ही विशेष रेल्वे गाडी सुरु करण्यात आली आहे. भाजप नेते सुनिल राणे यांनी ही माहिती दिली.
 
सुनिल राणे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्पकता आणि त्याला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची मिळालेली साथ यामुळे ही रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. येत्या २३ ऑगस्ट रोजी बोरीवलीतून कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज होणार आहे. २४ ऑगस्ट रोजी सकाळी यासाठीचा पहिला कार्यक्रम होणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
 
हे वाचलंत का? -  पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार! म्हणणं मांडण्याची मुदत संपली
 
ते पुढे म्हणाले की, "मुंबईतील कोकणी माणसाला अनेकदा दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जावं लागतं. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी बोरिवलीतून रेल्वे असावी, अशी मागणी कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. आता ही गाडी नियमितपणे सुरु होणार असून लवकरच तिचं वेळापत्रकही येईल. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी ही समाधानाची गोष्ट आहे," असेही ते म्हणाले. तसेच पीयूष गोयल यांनी निवडणूकीच्या आधी दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याने त्यांनी त्यांचे आभारही मानले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0