पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार! म्हणणं मांडण्याची मुदत संपली
17-Aug-2024
Total Views | 70
पुणे : यूपीएससीने उमेदवारी रद्द केलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीवर सुनावणीकरिता हजर न राहिल्याने तिला ही नोटीस बजावण्यात आली असून यापुढे तिला आपलं म्हणणं मांडता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहण्यासाठी पूजा खेडकरला डीओपीटीकडून नोटीस बजावण्यात आली होती. यानुसार १६ ऑगस्टपर्यंत तिला आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतू, ती उपस्थित न झाल्याने ही मुदत संपली आहे. त्यामुळे पूजा खेडकरला यापूढे तिची बाजू मांडता येणार नाही.
पुजा खेडकरच्या अहमदनगर आणि पुण्यातील निवासस्थानी तशी नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता यूपीएससीकडून पूजा खेडकरवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला २१ तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
पूजा खेडकरने नाव बदलून अनेकवेळा यूपीएससीची परिक्षा दिली होती. तसेच खोटं अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेटही सादर केले होते. शिवाय नोकरीवर रुजू झाल्यावर अवाजवी मागण्याही केल्या होत्या. त्यामुळे ती सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहे.