अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत? कोण असेल नवा उमेदवार?

15 Aug 2024 16:29:58
 
Ajit Pawar
 
पुणे : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. परंतू, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांचे पुत्र जय पवार यांच्या उमेदवारीबाबतही त्यांनी भाष्य केलं. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
जय पवारांना बारामतीतून उमेदवारी मिळणार का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मी बारामतीतून ७-८ निवडणूका लढवल्या आहेत. मला बारामतीतून लढण्यात फार रस नाही. त्यामुळे जनतेचा तसा कल असल्यास जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंट्री बोर्डमध्ये निर्णय होईल. पार्लमेंट्री बोर्ड आणि त्या भागातील कार्यकर्ते जी मागणी करतील तेच होईल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "चेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी..."; नितेश राणेंची अमोल कोल्हेंवर टीका
 
अजित पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूका लढणार आहे. ज्यावेळी आपण सेनापतींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतो त्यावेळी स्वाभाविक तो निवडणूकीच्या रिंगणात असणार. यात कुणाचंही दुमत नाही."
 
"अजितदादांना तसा प्रश्न विचारला म्हणून त्यांनी त्यावर तसं उत्तर दिलं. पण आम्ही निश्चितपणे दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढणार आहोत. आम्ही कुणीही दादांना आग्रह करण्याची आवश्यकता नाही. बारामतीकरांचं प्रचंड प्रेम आणि विश्वास दादांवर आहे. बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या प्रेमाच्या वर्षावाच्या माध्यमातूनच ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतील. विरोधकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. अवसान गळालेले विरोधी पक्षाचे नेते वेगवेगळी टीका आमच्यावर वेगवेगळी टीका करत आहेत. परंतू, आम्ही अतिशय ताकदीने आणि सक्षमपणे अजितदादांच्या नेतृत्वाखाली या निवडणूकीला सामोरं जाऊ आणि प्रचंड यश मिळवू," असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0