महापालिकांच्या निवडणूकांना उशीर होण्याचं एकमेव कारण म्हणजे उबाठा गट!

13 Aug 2024 12:37:27
 
UBT
 
मुंबई : महापालिकांच्या निवडणूकांना उशीर होण्याचं एकमेव कारण म्हणजे उबाठा गट आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. संजय राऊतांनी निवडणूकांवरून महायूतीवर टीका केली होती. यावर आता राणेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
 
नितेश राणे म्हणाले की, "मुंबई महापालिकेसह सगळ्याच महापालिकांच्या निवडणूकांना उशीर होण्याचं एकमेव कारण म्हणजे उबाठा गटाच्या कोर्टात असलेल्या याचिका आहे. त्यामुळे या याचिका मागे घ्या असं संजय राऊतांनी स्वत:च्या पक्षप्रमुखांना सांगावं. स्वत:च याचिका टाकतात आणि निवडणूका घेत नाही म्हणून बोंबलत बसतात. ज्यादिवशी ठाकरे गट कोर्टातून याचिका मागे घेईल त्यादिवशी महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूकीचा रस्ता मोकळा होईल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  संजय राऊतांनी मित्रपक्षांना पुन्हा डिवचलं, म्हणाले, "महाराष्ट्रात ठाकरे २..."
 
आम्हाला सर्वेची गरज नाही, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. यावर नितेश राणे पुढे म्हणाले की, "प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदारांची मानसिकता वेगळी असते. लोकसभेला वेगळी परिस्थिती होती आणि विधानसभेला वेगळी राहणार आहे. उबाठा गटाचा स्ट्राईक रेट सर्वात खराब आहे आणि हे काँग्रेसनेही मान्य केलं आहे. तुम्हाला मतदान करणारा मुस्लीम समाज आता मातोश्रीच्या उंबरठ्यावर येऊन तुम्हाला शिव्या घालतो आहे. त्यामुळे लोकसभेत जे तुमचे चुकून ९ खासदार निवडून आले ती परिस्थिती विधानसभेत राहणार नाही. तुम्ही हरणार असल्याने तुम्हाला सर्वेची गरज नाही. येणाऱ्या दोन महिन्यात परत एकदा महाराष्ट्रात महायूतीचं सरकार बसेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
Powered By Sangraha 9.0