मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा रद्द

बद्रीनाथ-विष्णू प्रयाग राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली

    08-Jul-2024
Total Views |

darad
 
डेहराडून : उत्तराखंडच्या गढवाल विभागात मुसळधार पावसामुळे रविवार, दि. 7 जुलै रोजी चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे. बद्रीनाथ-विष्णू प्रयाग राष्ट्रीय महामार्गाजवळ दरड कोसळल्याने रस्ता ठप्प झाला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली. तर उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
मदत विभागाच्या म्हणण्यानुसार, वीज पडून दोनजणांचा मृत्यू झाला. एकाचा बुडून मृत्यू झाला. तर पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीनजणांचा मृत्यू झाला. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आलेल्या पुरात आतापर्यंत 114 वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 95 प्राण्यांना वाचवण्यात यश आले आहे. शुक्रवार, दि. 5 जुलै रोजीपर्यंत उद्यानात 77 जनावरांचा मृत्यू झाला होता. सध्या 34 प्राण्यांवर उपचार सुरू आहेत, तर 50 प्राण्यांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
 
5,800 यात्रेकरू जम्मूहून अमरनाथला रवाना
पावसाने जोर धरलेला असतानाही शनिवार, दि. 6 जुलै रोजी पहाटे 5 हजार, 800 यात्रेकरूंचा एक जत्था जम्मू येथील दोन तळशिबिरातून अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला. दरम्यान, हिमालयाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 245 वाहनांचे दोन वेगवेगळे ताफे शनिवार, दि. 6 जुलै रोजी पहाटे जम्मूहून अमरनाथला रवाना झाले. एक ताफा पहाटेपूर्वी 2.50 वाजता आणि दुसरा ताफा पहाटे 3.50 वा. रवाना झाला. अमरनाथ यात्रेला रवाना झालेला हा यंदाचा नववा जत्था असून जम्मूच्या भगवतीनगर तळशिबिरातून तो मार्गस्थ झाला.
 
दरम्यान, मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे शनिवार, दि. 6 जुलै रोजी सकाळी बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरील अमरनाथ यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. चमोलीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू
चमोली जिल्ह्यात शनिवार, दि. 6 जुलै रोजी दरडी कोसळून हैदराबादहून आलेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील गौचर व कर्णप्रयाग यांच्यामध्ये चटवापीपलजवळ ही दुर्घटना घडली.
 
शेजारच्या पहाडाचा मोठा भाग महामार्गावर कोसळला. त्यात ढिगार्‍याखाली दबून दोनजणांचा मृत्यू झाला. निर्मल शाही (36) आणि सत्यनारायण (50) अशी मृतांची नावे आहेत. बद्रीनाथ यात्रा करून परतत असताना त्यांना मृत्यूने गाठले. “गढवाल विभागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाने दिलेला अंदाज पाहता, सर्व भाविकांना हृषिकेशच्या पलीकडे चारधाम यात्रेला न जाण्याचे आवाहन केले आहे,” असे गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले.