ईदला गोहत्या करू नका म्हणणाऱ्या मौलवीला जीवे मारण्याची धमकी; कट्टरपंथी धर्मगुरू रहमान अझहरीला पोलिसांकडून अटक

    04-Jul-2024
Total Views |
 Mufti arrested
 
दिसपूर : आसाम पोलिसांनी कट्टर इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरीला अटक केली आहे. त्याला मंगळवार, दि. २ जुलै २०२४ प्रशासनाविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. आसामचे डीजीपी जीपी सिंग यांच्या सूचनेवरून दारंग जिल्हा पोलिसांनी त्याला पकडले. मुकीबुर रहमान अझहरी यांनी सोशल मीडियावर लखमीपूर पोलीस स्टेशन आणि एसपी यांना हिंसक आंदोलनाची धमकी दिली होती.
 
मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरीने दि. ६ जुलै रोजी लखीमपूर पोलीस ठाण्याला घेराव घालण्याची धमकी दिली होती आणि ते त्याच्या तयारीत व्यस्त होते. एवढेच नाही तर ६ ते १० जुलै दरम्यान आसाममध्ये राज्यव्यापी नाकेबंदी आणि निदर्शने करण्याची धमकीही दिली होती. मौलाना मुस्तफा कमाल यांनी ईदच्या मुहूर्तावर केलेल्या आवाहनानंतर अजहरी यांनी हे वक्तव्य आणि धमकी दिली होती, ज्यामध्ये मौलाना कमाल यांनी मुस्लिमांना ईदनिमित्त गायींची कुर्बानी न देण्याचे आवाहन केले होते.
  
मौलाना मुस्तफा कमाल म्हणाले होते की, इस्लाममध्ये कुर्बानी महत्त्वाची आहे, मात्र केवळ गायीची कुर्बानी देण्याची अजिबात गरज नाही. आसामच्या कट्टरवाद्यांनी त्यांच्या विधानाला विरोध करत मौलाना मुस्तफा कमाल यांच्या अटकेची मागणी केली. याच क्रमाने मुफ्ती मुकीबुर रहमान अजहरी यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन मौलाना मुस्तफा कमाल यांच्या घरासह पोलीस ठाणे आणि एसपी कार्यालयाला घेराव घालू, ज्याच्यात हिम्मत आहे त्यांनी त्यांना थांबवून दाखवावे, असे म्हटले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
 
आसामचे मंत्री पीज हजारिका यांनी मुफ्ती मुकीबुर रहमान यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “ही व्यक्ती एका विशिष्ट समुदायाची आहे, जी अल्पसंख्याक आहे. ईदच्या दिवशी गायीची कुर्बानी देऊ नका, असे आवाहन करण्यात आले होते, मात्र याच्या आडून ही व्यक्ती द्वेष वाढवत आसाम पोलिसांना थेट व्हिडिओमध्ये आव्हान देत आहे. ही व्यक्ती हिंसाचाराची धमकीही देत आहे. आसाम कुठे चालला आहे?"
 
फेसबुक लाइव्ह सत्रादरम्यान, मुफ्ती म्हणाला की तो ६ ते १० जुलै दरम्यान लखीमपूर पोलीस स्टेशन आणि त्या “शैतान” (मुस्तफा कमाल) च्या घराचा घेराव करणार आहे. या काळात अनेक लोक माझ्यासोबत असतील. मुकीबुर रहमान अझहरीने जाहीर केले, “मला जाणून घ्यायचे आहे की तो माणूस किती शूर आहे. मला आज उत्तर लखीमपूर पोलीस स्टेशन मधून फोन आला आणि सांगण्यात आले की ६ जुलैला घेराव सारखे कोणतेही काम करू नका, पण मी त्या दिवशी नक्की येईन.. इन्शाअल्लाह.
  
मुस्तफा कमाल यांना शिवीगाळ करत तो म्हणाला की, “मी अजूनही जाईन इन्शाअल्लाह. त्या माणसाने हा खेळ सुरू केला आणि हा त्याचा शेवटचा खेळ आहे. मी हा खेळ संपवतो. इस्लामचा प्रचार करण्यासाठी मी खूप मेहनत घेतो. आता तुम्ही इस्लामचा अपमान करता का? तुम्ही मेसेंजरला (प्रेषित मुहम्मद) शिव्या देता. त्याने पैगंबराला सैतान म्हटले. त्यांनी माझे पाय कापले किंवा हात तोडले तरी मी जाईन. त्याने कितीही पोलिसांना बोलावले तरी मी जाईन." अजहरीच्या या धमकीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला मंगळदोई न्यायालयात हजर करण्यात आले आहे.