
भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हे हिंदूविरूद्ध मुस्लीम दंगली घडवणारे असल्याचे मत शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. अर्थात, हिंदूंविषयी अशी भूमिका घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळही नाही. या आधीही शिवसेना उबाठा गटाकडून विनाकारण हिंदू धर्माला संकुचित करण्याचा नाहक प्रयत्न झाला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याची समीक्षा करताना, अमुक म्हणजे भाजपाचे हिंदुत्व आणि तमुक म्हणजे शिवसेनेचे हिंदुत्व, ही नवीन टूम संजय राऊत यांनी काढली आहे. मुळात हिंदुत्व हे एक आहे आणि ते एकच राहणार. त्यात कोणताही भेद नाही हे संजय राऊत यांनी समजून घेणे गरजेचे आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी धर्माची शकले करू पाहणारे संजय राऊतांसारखे राजकारणी कायमच हिंदू धर्माला शेंडी जानव्याचे हिंदुत्व म्हणून टीका करतात. अर्थात, यामागे असलेला जातीवादी अजेंडा पुढे रेटण्यासाठीच धर्माची शकले करण्याचे कारस्थान संजय राऊतांसारखी माणसे करत असतात. त्याचप्रमाणे हिंदुत्वाची घंटा बडवणारे हिंदुत्व अशी हेटाळणी करण्यातदेखील संजय राऊत यांना लाज वाटली नाही. हिंदू धर्मात प्रत्येक देवळात एक घंटा असतेच. इतकेच नव्हे तर देशातील प्रत्येक हिंदूच्या घरात शंख आणि घंटा असतेच. याच घंटेच्या निनादाने नकारात्मकता दूर जाते असा प्रत्येक भक्ताचा विश्वास असतो. त्यामुळे संजय राऊत यांनीसुद्धा घंटा वाजवली पाहिजे, म्हणजे त्यांच्यातील नकारात्मकता दूर होईल. हिंदूवर अशी टीक करणारे संजय राऊत पुढे येऊन, कधी मुस्लीम किंवा अन्य धर्मीयांविषयी बेताल बोलण्याचे धाडस करताना, आजकाल दिसत नाहीत. मुस्लीम नेते, त्यांचे पक्षदेखील अनेक आहेत, मात्र त्यांचे मुस्लीमपण वेगळे म्हणायचे धाडस संजय राऊत यांना आजवर करता आले नाही आणि ते यापुढेदेखील होणार नाही. काँग्रेसच्या वळचणीला गेल्याने त्यांना खूश करण्यासाठी, ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे ‘हिंदुहृदसम्राट’ देखील काढले, त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीच. त्यामुळे अनावश्यक बरळण्याचे संजय राऊत यांनी टाळणे आवश्यक आहे. राऊत यांचे हिंदू धर्माविरोधात दररोज दूरदर्शनवर येऊन बरळणे कमी झाले नाही, तर संजय राऊत यांनी पसरवलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी उभ्या महाराष्ट्राला एक दिवस घंटानाद करावा लागेल हे नक्की.
उरणमध्ये लव्ह जिहादचा बळी गेल्यावर पुन्हा अचानक हा विषय चर्चेला आला. या देशात लव्ह जिहाद जसजसा तो वाढत आहे, तसे त्यातील क्रौर्यदेखील वाढताना दिसत आहे. मात्र, अजूनही हे षड्यंत्र नसून, प्रेमविवाहाचा भाग असल्याच्या मधुर स्वप्नात अनेक जण निद्रिस्त आहेत. या निद्रासनात लिप्त असलेल्यांना नेमकी जाग कधी येणार, हे कळणे कठीणच आहेत. जी ताजी घटना उरण भागात घडली आहे, आणि या घटनेतील हाती आलेली माहिती मन विषण्ण करणारीच आहे. सातत्याने हिंदूंच्या मुलींना फसवून, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, काहीकाळ प्रेमाचे नाटक करत अपेक्षित स्वार्थ साध्य नाही झाल्यास अथवा झाल्यावरही अत्यंत क्रूरतेने निर्ममपणे तिला मृत्यूच्या स्वाधीन करण्याचे काम लव्ह जिहादमध्ये योजनाबद्ध पद्धतीने होताना दिसत आहे. याचे प्रमाणदेखील वेगाने वाढलेले सध्या दिसत आहे. लव्ह जिहाद ही मानसिकता ओळखताना हिंदू समाज आजही कमी पडतो आहे. लव्ह जिहादमध्ये बळी गेल्यावर, तो बळी घेणार्या नराधमाला अटक होते, पुढे कायदेशीर कारवाईदेखील होते, शिक्षाही होते. मात्र, सध्या उपलब्ध कायदा हा प्रकार रोखू शकेल, असे काही लक्षण वाढलेल्या प्रकारांवरून दिसत नाही. त्यासाठी जशी निश्चितच एका कायद्याची निर्मिती करणे आवश्यक आहे, तशी यातील शिक्षादेखील न भूतो न भविष्यती अशी कठोर आणि निर्मम असणे गरजेचे आहे. त्याशिवाय अशा पाशवी अत्याचारांवर बंधने येणार नाहीत हे निश्चित. लव्ह जिहादसारख्या विषयांवर सरकारकडून कायद्याच्या रूपाने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे हिंदू कुटुंबानेसुद्धा वयात येणार्या आपल्या मुलींशी याबाबत कोणताही आडपडदा न ठेवता बोलणे, त्यांना समाजातील या वाढत्या धोक्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. मात्र, या सुसंवादामध्ये कुठेतरी कुटुंबे कमी पडतानाचे चित्र आहे. त्याची परिणती अशा प्रसंगांमध्ये होत असते. लव्ह जिहाद हे एक छुपे युद्धच असून, ते हिंदूंना कळण्यास लागलेला विलंब हा या प्रकरणाचा धोका वाढवणारा ठरण्यास साहाय्यभूत घटक होत आहे. त्यामुळे आता जाग आलीच आहे तर, आता लव्ह जिहादविरोधात हिंदूधर्मीयांनीही समाज म्हणून संघटित आणि सक्रिय कार्य करणे अतिआवश्यक झाले आहे.
कौस्तुभ वीरकर