कुर्ला, पवई, बोरिवलीतील हरित परिसर होणार आणखी घनदाट

चार एकर क्षेत्रफळावर बीएमसी करणार वृक्षलागवड

    23-Jul-2024
Total Views |
Harit Mumbai
 
मुंबई : मुंबई महानगरातील पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील कुर्ला, पवई आणि बोरिवली ही तीन ठिकाणे मिळून तब्बल चार एकर क्षेत्रफळावर साडे तीन हजार वृक्षांची पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
 
मुंबई महानगरातील झाडांची निगा कशी राखावी, त्यांचे संगोपन कसे करावे, वृक्षलागवड क्षेत्रात कोणकोणते अभिनव उपक्रम राबविण्यात येतील, झाडांची पडझड कशी रोखावी आदी विषयांवर उहापोह करण्यासाठी महानगरपालिकेचे आधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ आदींची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवार,दि. २२ जुलै रोजी बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी बोलत होते.
 
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदींसह आदींसह विविध पर्यावरणविषयी संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त गगराणी म्हणाले, मुंबईत अनेक ठिकाणी पुरातन वृक्ष आहेत. त्यांचे संगोपन करण्यासाठी बीएमसी विविध उपक्रम राबवित आहे. धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी वेळच्यावेळी करण्यात येते.
 
यासह अधिकाधिक ठिकाणी वृक्षांची लागवड कशी वाढविता येईल, यासाठी देखील महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत तीन मोठ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, तसेच पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी मोठे भूखंड वृक्ष लागवडीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. हे तीन ठिकाणे मिळून चार एकर भूखंडावर साडे तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
 
या झाडांची निवड कशी करावी, त्यासाठी कोणती शास्त्रोक्त पद्धत वापरावी, त्यांचे आयुर्मान वाढवावे यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत महानगरपालिका आराखडा तयार करीत आहे. यासाठी पर्यावरणतज्ज्ञांनी मत नोंदवावे, असे आवाहन गगराणी यांनी केले. महानगरपालिका कार्यक्षेत्रात आणखी २९ ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचेही गगराणी यांनी नमूद केले.