'बिग बॉस ३'ओटीटी शो तातडीने बंद करा! मनिषा कायंदेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

22 Jul 2024 18:09:17
 
Manisha Kayande
 
मुंबई : महाराष्ट्रात रिअलिटी शोच्या नावाखाली अश्लिलता खपवून घेणार नाही. 'बिग बॉस ३'ओटीटी शो तातडीने बंद करा, अशी मागणी शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.
 
मनिषा कायंदे यांनी सोमवारी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या बिग बॉस सिजन ३ मधील १८ जुलै २०२४ रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कलाकार कॅमेऱ्यासमोर अतिशय बीभत्स आणि किळसवाणे कृत्य करत असल्याचे सांगितले. या शोदरम्यान अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी कलाकारांच्या कौटुंबिक नात्याच्या सर्व सीमा पार करत सामाजिक मूल्ये पायदळी तुडवली आहेत, अशी टीका त्यांनी केली.
 
हे वाचलंत का? -  "मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेण्यासाठी ठाण्यात..."; चित्राताईंचा राऊतांना टोला
 
त्या पुढे म्हणाल्या की, "बिग बॉस ३ या शोने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लहान मुलंही हा शो पाहतात. अरमान मलिक यांच्या बोलण्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो. त्यामुळे हा शो तातडीने बंद करावा. या शोचे निर्माते आणि प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीच्या सीईओंवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी. सदर व्हिडिओ विविध सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाला आहे का? याची तपासणी करावी, तसेच हा गुन्हा ज्या कायद्याखाली येत असेल ते सर्व कलम सदर शोमध्ये भाग घेणाऱ्या लोकांवर आणि शोच्या सीईओवर लावण्यात यावेत," अशी मागणी त्यांनी केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0