"मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेण्यासाठी ठाण्यात..."; चित्राताईंचा राऊतांना टोला
22-Jul-2024
Total Views |
मुंबई : मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार करून घेण्याकरिता तुमच्यासाठी ठाण्यात आणि पुण्यात खास खाट रिझर्व्ह ठेवली आहे, कधी ॲडमिट होणार आहात? असा खोचक सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला आहे. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "शब्द फिरवण्यात, रेवड्या उडवण्यात आणि बेमालून संदर्भ देण्यात तुमचा कोणी हात धरू शकणार नाही. पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही प्रचंड खोटारडे आहात. 'फेक नॅरेटिव्ह' ला ठोकून काढा, असे देवेंद्रजींचे आदेश आहेत. तुम्ही त्याचा सोयीस्कर अर्थ माणसांना ठोकून काढा, असा लावून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत, हे मान्य करा."
"लोकसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला कौल दिला, असे उद्गार काढताना थोडी तरी लाज वाटू द्या. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्रजी मोदी हेच विराजमान आहेत. तुमचे इन-मीन सात-आठ खासदार विरोधी पक्षांच्या बाकावर बसून पाच वर्षे बाके वाजवणार आहेत, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "रोज उठून भाजपवर भुंकणं आणि सूर्यावर थुंकणं, हे तुमचे धंदे चालू राहू द्या. महायुतीचे नेते विकास कामांमध्ये गुंतले आहेत, तुमच्या फालतू आरोपांना उत्तर द्यायला कोणाकडेही वेळ नाही. मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार करून घ्यायला तुमच्यासाठी ठाण्यात आणि पुण्यात खास खाट रिझर्व्ह ठेवली आहे, कधी ॲडमिट होताय?" असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना विचारला आहे.