मुंबई : विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरे मविआला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. उबाठा गट मुंबईतील २५ जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकसभा निवडणूकीत उबाठा गटाने मुंबईतील सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तसेच २०१९ च्या विधानसभेतही त्यांनी मुंबईतील १४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळीही उबाठा गट मुंबईतील सर्वाधिक जागांवर दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण काँग्रेस आणि शरद पवार गट हे मान्य करणार की, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागावाटपावरून मविआत वाद होईल? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - SNDT महिला विद्यापीठात यशस्वी विज्ञान प्रदर्शन!
याशिवाय संजय राऊतांनीही मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. "आम्ही २८८ जागांची चाचपणी करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष २८८ जागांचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांचा हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर सगळे एकत्र बसून कोण, कुणे आणि किती जागा लढायच्या हे ठरवू. तसेच लोकसभेप्रमाणेच जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल हे आमचं सूत्र आहे," असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे जो जिंकेल त्याची जागा या सुत्राप्रमाणे उबाठा गट मुंबईत मविआला दणका देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.