मुंबई : राष्ट्रभक्तांचा अतिरेकी म्हणून उल्लेख सहन होणारा नाही, असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला आहे. राज्यात सध्या विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला असून अतिक्रमणांविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरम्यान, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती हे तेथील दर्गा आणि मशिदीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना मुस्लिमांनी प्रश्न विचारला. विशाळगडावर तोडफोड करणारे शिवभक्त होते की, अतिरेकी? असा सवाल त्यांनी केला. यावर शाहू महाराजांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आणि शिवभक्तांना अतिरेकी संबोधले. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नितेश राणेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचलंत का? - पूजा खेडकर यांच्या आईला अटक!
नितेश राणे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख धर्माचा अभिमानी राजा, देशाचा संरक्षक राजा, चारित्र्याचा पालक राजा आणि देशोद्धार घडविणारा राजा म्हणून केला जातो. आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगडावर असलेल्या अनधिकृत अतिक्रमणामध्ये देशद्रोही यासिन भटकळ येऊन राहून जातो आणि या वस्तुस्थितीवर शिवभक्त आक्रमक होणार नाही तर अलकायदा आणि इसिस आक्रमक होणार का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या यासिन भटकळला विशाळगडावर आश्रय मिळतोच कसा? विशाळगडावरील भारतमातेचे सुपुत्र हे जर अतिरेकी असतील तर यासीन भटकळ हा कोण? विशाळगडावरील जे राष्ट्रभक्त होते त्यांना अतिरेकी म्हणण्याचे जे षडयंत्र आखले जात आहे ते प्रत्येक राष्ट्रभक्ताला चांगलेच माहिती आहे."
"शिवरायांचा पाईक असणाऱ्या कोणत्याही राष्ट्रभक्ताला राष्ट्रभक्तांचा उल्लेख अतिरेकी म्हणून सहन होणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे जसे देशाचे संरक्षक होते त्याप्रमाणे प्रत्येक शिवभक्त हा देशाचा संरक्षक आहे. त्यामुळे शिवभक्त हे राष्ट्रभक्तच आहेत," असेही नितेश राणे म्हणाले.