पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत धमकावतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून पुणे पोलिसांची चार पथकं त्यांचा शोध घेत होती.
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेतलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरचा गैरवापर केल्याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनोरमा खेडकर यांच्यावर मुळशीतील जमीन हडप केल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्या फरार होत्या. आता रायगड जिल्ह्यातील एका गावातून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवण्यात आले असून त्यांना मसूरीतील प्रशासकीय अकादमीला रिपोर्ट करण्याच्या सुचना राज्य सरकारने दिल्या आहेत. पुणे पोलिसांनी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.