मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rashtra Sevika Samiti) "प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहित सर्वोच्च मानून नागरी कर्तव्ये पार पाडणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला संकल्पबद्ध समाज घडवायचा आहे आणि त्यासाठी काम वाढवायचे आहे.", असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले.
हे वाचलंत का? : विद्येच्या मंदिरात राडा घालणाऱ्या संघटनेवर बंदी घाला!
राष्ट्र सेविका समितीची केंद्र कार्यकारिणी आणि प्रतिनिधी मंडल प्रथम अर्धवार्षिक बैठक १२ ते १४ जुलै दरम्यान रेशीम बाग, नागपूर येथे संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीत ३५ प्रांतातील ४०० प्रतिनिधी सहभागी झाले होते.
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त ३०० कार्यक्रमांचे नियोजन प्रतिनिधी बैठकीत करण्यात आले. यामध्ये लोकमाता अहिल्याबाई यांच्या जीवनावर आधारित स्पर्धा, रील, नाट्यप्रवेश, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, युवा वसतिगृहांना भेटी देऊन अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची जाणीव करून देणे आदी कार्यक्रमांतून लोकमाता अहिल्याबाई यांचे जीवन लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आणीबाणीची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये हे नितांत आवश्यक आहे. आणि म्हणूनच भारत सरकारने २५ जून रोजी 'संविधान हत्या दिन' साजरा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यासोबतच 'राष्ट्र सर्वोपरी' या विषयावरील ठराव मंजूर करण्यात आला. या माध्यमातून सर्व भारतीयांनी त्यांचे उत्तम तत्वज्ञान आणि जीवनमूल्ये अंगीकारून ती आचरणात आणावीत, असे आवाहन या बैठकीतून समाजाला करण्यात आले.