आता प्रत्येक तालुक्यात करिअर मार्गदर्शन शिबीर!

मंगलप्रभात लोढांची घोषणा; कौशल्य विकास विभागाची ३ महिन्यांची रूपरेषा जाहीर

    07-Jun-2024
Total Views |
mangal prabhat lodha


मुंबई :      लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येताच राज्याचे कौशल्य विकास मंत्री यांनी कामांचा धडाका सुरू केला असून, आपल्या विभागाची ३ महिन्यांची रुपरेषा जाहीर केली आहे. त्यानुसार, येत्या १० जूनपासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाणार आहे.

१० वी आणि १२ वी हा आयुष्याच्या वळणावरचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. या वळणावर करिअरची अचूक दिशा सापडल्यास भविष्य उज्ज्वल होते. ही बाब ध्यानात घेऊन मंत्री लोढा यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शाहू महाराज करियर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याची घोषणा केली आहे. सोमवार, दि. १० जून रोजी पुणे येथील पंडित भीमसेन जोशी कला मंदिरात या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
 
 


त्याशिवाय जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशातील सर्व स्टार्टअपची २ दिवसीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील १५० ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित करण्याचा कार्यक्रम ८ जुलै २०२४ पासून सुरू होणार आहे. सदर मेळावे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पूर्ण होणार आहेत. राज्यातील महसूल विभागात प्रत्येकी एक आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी उभारण्यात येणार आहे. याद्वारे राज्यातील युवकांना विदेशात नोकरी मिळण्यासाठी संधी उपलब्ध होणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.
 

स्वच्छ भारत अकादमी उभारणार

राज्यातील ५ महसुली विभागात स्वच्छ भारत अकादमी उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील १ हजार महाविद्यालयांत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. राज्यातील १ हजार ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कैशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.