अबोल संवादाचा बादशाह...

Total Views |
Kunal Mottling


आपली कला ही लोकांना कायमस्वरुपी स्मरणात राहील, असे विरळेच. असेच एक अबोल संवादातून प्रेक्षकांशी नातं जोडणारे माईम आर्टिस्ट कुणाल मोटलिंग यांच्याविषयी...

कुणाल यांचं बालपण ठाण्यात गेलं. तिथेच त्यांनी दहावीपर्यंतचे धडे शिवसमर्थ विद्यालयातून घेतले. कलाकार होण्याची आवड तशी लहानपणापासूनच. त्यात अभ्यासात कुणाल यांना फारसा रस कधीच नव्हता. शालेय जीवनातही नृत्य, नाट्य, खेळ याकडे कुणाल यांचा कल. घरच्यांचा ओरडा खाऊन कशीबशी त्यांनी दहावी पूर्ण केली आणि त्यानंतर महाविद्यालयाची पायरी ते चढले. अकरावी आणि बारावीचे शिक्षण आर्ट्स शाखेत घेण्याचा निर्णय कुणाल यांनी घेतला खरा, पण घरच्यांनी सांगितलेल्या महाविद्यालयातूनच त्यांना शिक्षण घ्यावे लागले. बालपणापासूनच कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगणार्‍या कुणाल यांचे मन काही केल्या त्या महाविद्यालयात रमले नाही. कारण, तिथे फारसे सांस्कृतिक कार्यक्रम होत नसे. मग काय, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता बारावीनंतर कुणाल यांनी माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयात आपला मोर्चा वळवला तो अभ्यासाच्या ओढीने नाही, तर केवळ कला क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल, या आशेने!
 
कुणाल यांना लहानपणापासून लोकनृत्य आणि माईमची कला याबद्दल माहिती देखील होती आणि या दोन क्षेत्रात विशेषत: करिअर घडवायचे होते. मिस्टर बिन, चार्ली चॅपलिन काहीही न बोलता केवळ चेहर्‍यावरील हावभाव आणि शारिरिक हालचालींवरुन प्रेक्षकांचे निव्वळ मनोरंजन करतात, त्याला ‘माईम कला’ म्हणतात. एकही शब्द न उच्चारता प्रेक्षकांचे मनोरंजन करता येते, याबद्दल विशेष आकर्षण वाटल्यामुळे कुणाल यांनी ‘माईम आर्टिस्ट’ म्हणून आपली ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी शिकवणी सुरु केली. जीवनात आर्थिक पाठबळ कुणी दिलं नाही तरी मानसिक आधार देणारी व्यक्ती ही फार महत्त्वाची. कोणत्याही क्षेत्रात पाय खेचणारे हजारो हात असतात, पण हात पुढे करुन आपल्याला शिखरावर नेणारे फार कमी असतात आणि कुणाल यांच्या जीवनात त्यापैकी दोन हात होते ते म्हणजे त्यांच्या शिक्षिका आणि त्यांची साथीदार. कुणाल यांना रुईया महाविद्यालयातील त्यांच्या एका शिक्षिकेने ‘माईम’ या कलेशी ओळख करुन देत ऑडिशन देण्याचा सल्ला देखील दिला.

महाविद्यालयीन जीवनात कुणाल यांनी दिलेल्या ऑडिशनमधून त्यांची निवड झाली आणि पहिल्यांदा ‘युथ फेस्टिव्हल’साठी कुणाल यांनी स्टेजवर ‘माईम परफॉर्मन्स’ सादर केला. जसं एकही वाक्य न बोलता, कुणाल यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तसेच त्याची पोचपावती कुणाल यांना भरघोस टाळ्यांतून मिळाली आणि तिथंपासून खर्‍या अर्थाने आर्थिक साधन आणि मनोरंजनाचे साधन याचा मिलाफ करत ‘माईम’ कलेला कुणाल यांनी सर्वस्व अर्पण करत, एक नवा प्रवास सुरु केला. मग हळूहळू स्टेज शो करण्यास कुणाल यांनी सुरुवात केली आणि प्रेक्षकांची मिळणारी दाद त्यांना अधिक ऊर्जा देऊ लागली. प्रेक्षकांनी त्यांच्या कलेची कधीच खिल्ली उडवली नाही, याउलट अनेक लहान मुलांनी कुणाल यांना ‘आम्हालाही तुमच्यासारखं व्हायचं आहे’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आणि त्यामुळेच कुणाल यांनी ‘माईम’ ही कला आपल्याला भविष्यात तग धरण्यास आणि नाव मिळवून देण्यास साथ देऊ शकते, याची जाणीव करुन देणारी ठरली.
 
‘माईम’ ही कला जरी फार जुनी असली तरी त्यातून कितीसे पैसे मिळणार? शिवाय कुणी आपल्याला विचारलं की पोटापाण्यासाठी काय करतो, तर काय उत्तरं द्यायची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरेही कुणाल यांनी तयार ठेवली होती. कारण, त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत ‘माईम’ ही कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, हे त्यांनी मनाशी अगदी पक्क केलं होतं. या काळात त्यांच्या घरच्यांनी, ताही मित्र-मैत्रिणींनी मानसिक खच्चीकरणही केलं. ‘तोंडाला रंग लावून असा कोणता अभिनय करणार आहेस’ अशी बोचरी टीकाही त्यांना सहन करावी लागली. पण, कुणाल यांनी या टीकांकडे, टोमण्यांकडे दुर्लक्ष करुन ‘माईम’चे क्लासेस घेण्यास आणि ज्यांना ‘माईम’ शिकण्याची इच्छा आहे, त्यांना आपल्या ज्ञानातून ते देण्यास सुरुवात केली.सद्यस्थितीला कुणाल अंध लहान मुलांना ‘माईम’ची कला शिकवतात.

 त्याशिवाय ऑटिस्टक मुलं, अनाथ मुलं यांनाही ते ‘माईम’ची कला अवगत करुन देतात. याव्यतिरिक्त अभिनय क्षेत्रात देखील ‘माईम’ या कलेचे फार महत्त्व असल्याकारणाने ते कलाकारांना देखील ‘माईम’ शिकवतात. शिवाय देशभरातील विविध शाळा-कॉलेज आणि कॅफेमध्ये जाऊन ‘माईम’चे परफॉर्मन्स करत, या कलेविषयी अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे कामदेखील ते करतात. तसेच, कुणाल हे ‘वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन’चे सदस्यदेखील आहेत. त्यामुळे १५ वर्षांपेक्षा अधिक काळ ‘माईम’चे कलाउपासक कुणाल, या क्षेत्रात ज्यांना काम करण्याची ओढ आहे, त्यांना मार्गदर्शन देखील करतात. एकही संवाद किंवा वाक्य न बोलता, केवळ निर्व्याजपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ‘माईम आर्टिस्ट’ कुणाल मोटलिंग यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून खुप शुभेच्छा!रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.