पेणच्या संघ तारांगणातील तळपता तारा हरपला...

    06-Jun-2024
Total Views |
 Kamlakar Madhusudan Ghate
 
पेणचे ज्येष्ठ स्वयंसेवक कमलाकर मधुसूदन घाटे सर यांचे दि. २९ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या संघ व सामाजिक कार्यकर्तृत्वाचा अल्पसा परिचय करुन देणारा हा लेख...
 
पेण प्रायव्हेट हायस्कूलचे माजी प्राचार्य क. म. घाटे यांच्या दुःखद निधनाची वार्ता येऊन धडकली आणि सार्‍या पेण शहरावर शोककळा पसरली. क. म. तथा घ. च. घाटेसर या पेणमधील आदरणीय आणि सर्वमान्य अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अस्त झाला. घाटेसरांचे व्यक्तिमत्त्व हे त्यांच्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर तसेच विविध क्षेत्रांतही प्रभुत्व गाजविणारे आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे होते. हिंदुत्वनिष्ठ, संघसंस्कारयुक्त घाटे घराण्यात त्यांचा जन्म झाल्याने बालवयात लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वर्तमानपत्राचा वाचनसंस्कार आणि त्याच्या जोडीला आपल्या बंधूंच्या बरोबर संघसंस्कार आपोआपच होत गेले. घाटे हे कूळ पेणचे आदरणीय व प्रतिष्ठित घराणे. ज्यामध्ये डॉ. गजाननराव घाटे, मदनभाऊ घाटे, माजी मुख्याध्यापक टी. बी. घाटे यांचा उल्लेख केला जातो. त्याच परंपरेमध्ये पेण गावात के. एम. घाटेसर यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते.‘पेण प्रायव्हेट हायस्कूल’ या पेणच्या नामांकित शाळेमध्ये शिक्षण पूर्ण करून, महाविद्यालयीन शिक्षण व नोकरीनिमित्त क. म. घाटे मुंबईला गेले.

पदवीधर झाल्यावर भारतीय रेल्वेत नोकरीसही लागले. पण, आपली जन्मभूमी (जन्मगाव) पेण हीच आपली कर्मभूमी असावी, या उदात्त विचाराने, एका विशिष्ट ध्येयवाद उराशी बाळगून आपल्याच शाळेत - प्रायव्हेट हायस्कूल, पेण येथे इंग्रजीचे शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले. इंग्रजी विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. योग्य संधी चालून आली आणि तरुण-तडफदार आणि आश्वासक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांची नियुक्ती प्रायव्हेट हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदावर केली गेली. आता घाटेसर हे प्रायव्हेट हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या बळावर प्रायव्हेट हायस्कूलला शैक्षणिक क्षेत्रात नामांकित माध्यमिक विद्यालय म्हणून नावलौकिक मिळवून दिला. उच्च आणि श्रेष्ठ परंपरा जपण्याची त्यांचीही तपश्चर्या या शाळेला महाराष्ट्रातील पाच नामांकित शाळांमधील एक शाळा म्हणून स्थान प्राप्त करून देणारी ठरली.

शालेय अभ्यासक्रमाच्या ‘१०+२+३’ या नवीन आकृतिबंधानुसार ‘+२’ म्हणजे अकरावी व बारावीचे वर्ग सुरू झाले. महाराष्ट्रातील काही निवडक शाळांनाच अकरावी-बारावीचे वर्ग जोडले जाणार होते. त्यामध्ये मा. घाटेसरांच्या प्रा. हायस्कूलचा समावेश झाला. त्यामागे घाटे सरांचे नेतृत्वगुण, कर्तृत्व आपण दूरदर्शीपणा यांचाच सिंहाचा वाटा होता. आता ‘प्रायव्हेट हायस्कूल संलग्न ज्युनिअर कॉलेज’ असे शाळेने नाव आणि स्वरूपही बदलले आणि मुख्याध्यापक घाटेसर आता ‘मा. प्राचार्य’ झाले. घाटेसरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वात ‘प्रा. हा. ज्युनिअर कॉलेज’ आता मानाचे स्थान मिळवून सुप्रसिद्ध झाले. एसएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेचा विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये झळकणे शाळेच्या यशाचे, नावलौकिकाचे, प्रतिष्ठेचे गमक मानले जाई. त्यामध्ये त्या काळात मुंबई-पुण्याच्या नामांकित शाळाच असत, हे घाटेसरांना पटणारे नव्हते.

यासाठी त्यांनी त्या शाळांना भेटी दिल्या. त्यांच्या अध्ययन-अध्यापनाच्या पद्धती वैशिष्ट्ये, परीक्षासराव पद्धती इत्यादीचा बारकाईने अभ्यास करून त्यानुसार स्वतःच्या शाळेत ते उपक्रम व योजना यशस्वीपणे आखून, त्याची कार्यवाही करून आपलाही विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ शकतो, हे महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले आणि पुढे हीच परंपरा प्रायव्हेट हायस्कूल, नेने कन्या विद्यालय अशा ‘पेण एज्युकेशन सोसायटी’च्या शाळांनी चालू ठेवली आहे. अशी ही गुणवत्ता, यशस्वितेची मालिका आजही अव्याहतपणे सुरुच आहे.११० वर्षांची उज्ज्वल परंपरा जोपासणार्‍या ‘पेण एज्युकेशन सोसायटी’च्या प्रायव्हेट हायस्कूलचे मुख्याध्यापक व ‘मा. प्राचार्य’ म्हणून सेवा कार्यकाल पूर्ण करत असताना आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता ते सन्मानाने आणि समाधानाने निवृत्त झाले.

दीनदयाळ पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली 

प्राचार्य म्हणून निवृत्त झाले तरी घाटे सरांचा पिंड निवृत्तीचा नव्हता. काहीतरी समाजोपयोगी कार्य करावे, या प्रेरणेनेच आर्थिक क्षेत्रात समाजाच्या हितासाठी ‘पतसंस्था’ हा विषय चर्चेत होता. सामान्य माणसाला अभिमानी व स्वावलंबी बनवावे. भाजीपाला-काकडी-कलिंगड उत्पादक असा छोटा शेतकरी, खेड्यापाड्यांतला बांधव यांना साहाय्य करावे, हा विचार पूर्णत्वास नेण्यासाठी आपले स्वयंसेवक बंधु, सहकारी यांना एकत्र करून -संघ विचार हा केवळ सैद्धान्तिक तात्त्विक विचार नाही, तर सामान्य माणसाला आर्थिक स्वावलंबी व स्वाभिमानी बनविणारा व्यवहारी विचार आहे. हे त्यांनी दीनदयाळ पतसंस्थेच्या रुपाने मूर्तस्वरूपात साकार केले. आता प्राचार्य घाटेसर ’दीनदयाळ पतसंस्थे’चे संस्थापक-अध्यक्ष झाले. अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ‘दीनदयाळ पतसंस्थे’ची घोडदौड सुरू झाली. अल्पावधीतच रायगड जिल्ह्याच्या आर्थिक सहकारी संस्थांच्या पंगतीत एक नामवंत, सुप्रतिष्ठित पतसंस्था म्हणून ‘दीनदयाळ’चा नावलौकिक पसरला.

अध्यक्ष या नात्याने पतसंस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर ते ‘वैयक्तिक लक्ष’ ठेवत असत. कोणताही सन्माननीय सभासद सहज म्हणून भेट द्यायला आला की, घाटेसर त्यांच्यापुढे सभासदसंख्या, ठेवी, कर्ज इ.ची सर्व आकडेवारी समोर ठेवत आणि आरशासारखा पारदर्शक व्यवहार त्यांच्यासमोर मांडत असत. असा चोख व्यवहार, ग्राहकोपयोगी योजना समजावून दिली की, तो स्वेच्छेने सभासद ठेवीदार बनत असे. ‘आपुलकीने वागणारी माणसं’ अशी जाहिरातीची म्हणूनच कधी गरज पडली नाही. मूळचे पेणचे असणारे, पण नोकरी व्यवसायानिमित्त पुण्या-मुंबईला वा अन्यत्र गेलेले पेणकर पेणला आले की, घाटेसरांची पतसंस्था, ‘केएमजी’ची पतपेढी म्हणून संघविचार आणि आपलेपणाचा व्यवहार कौतुकाने पाहत असत आणि त्या प्रभावामुळे आपणहून ठेवीदार ‘सभासद’ बनत असत आणि इतरांनाही सांगत असत. पुढील काळात वयोमानानुसार आणि पुढच्या पिढीला संधी देण्याच्या स्वभावानुसार व पद्धतीनुसार क. म. घाटे अध्यक्षपदावरून निवृत्त झाले आणि पतसंस्थेची धुरा नवीन पिढीतील कार्यकर्त्यांकडे त्यांनी विश्वासाने सोपवली.
 
सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभाग

शिक्षण क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्रात आपला ठसा उमटवून घाटेसर आता सामाजिक क्षेत्रात कार्यरत झाले. विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, अहिल्या मंडळ, वृद्धाश्रम अशा संघसंबंधित विविध संस्था, संघटना तसेच कार्यक्रम आणि उपक्रम यामध्ये घाटेसरांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. बैठका, सभासंमेलने यामध्ये सहभागी होत असत. पेण रेल्वे प्रवासी संघटना, अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समिती यामध्ये सक्रिय सहभागी झाले होते. अशा विविध आंदोलन - चळवळीत सहभागी होणारे घाटेसर घ.च. ॠ. हे पेणमधील प्रथितयश नागरिकांच्या गटात अग्रभागी विराजमान झाले. त्यामुळे समाजाचे नेतृत्व त्यांच्याकडे आपोआपच चालत आले आणि ते भाजपचे खंदे पुरस्कर्ते व कार्यकर्ते बनले. पूर्ववयात नोकरीच्या कारणाने जनसंघाच्या प्रत्यक्ष कामात, राजकारणात सहभागी नसणारे घाटेसर आता भारतीय जनता पक्षाच्या कामांत बैठकांत, प्रसंगी सभा संमेलनांतही हिरिरीने भाग घेऊ लागले. २०१४ आणि २०१९च्या मोदीलाटेचा अनुभव त्यांनी घेतला. त्याकाळात ते त्यामध्ये आनंदाने व समाधानी वृत्तीने सहभागी झाले होते. आताही ‘अब की बार, चारसों पार’ला ते शारीरिकदृष्ट्या उपस्थिती देऊ शकत नव्हते. पण, त्यांच्या मनात मात्र तो विचार सारखाच येई आणि ते उत्साहित होत असत.
 
एक सामान्य संघ स्वयंसेवक ते सन्माननीय मार्गदर्शक असा त्यांचा जीवनप्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या जीवनप्रवासात त्यांच्या सुविद्य पत्नी घाटेमॅडम (माजी मुख्याध्यापिका) यांची अमूल्य आणि समर्थसाथ लाभली होती. घाटेसरांचे बुद्धिवैभव, संघटन कौशल्य, वाक्चातुर्य, प्रसंगावधान आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, हे अंगभूत गुण लक्षणीयच होते. स्वकर्तृत्वावर त्यांनी हे साध्य केले होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या सुविद्य पत्नी सुमित्रा, कन्या डॉ. ऋता वाघारकर (अमेरिका), मुक्त सर मुकादम, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पेणच्या नामवंत, कर्तृत्ववान, त्यागी कार्यकर्त्यांचा संच हे एक तारांगणच आहे, त्या तारांगणातील हा क. म. घाटे नावाचा तळपता तारा लोप पावला आहे. त्यांचे हे गुण व संघशरणता लक्षात ठेवून आपणही तसे व्हावे, असे वाटणे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.


विश्वास नरहरी मुळे