"मी दारिद्र्य रेषेखालील नेता, आता मला घर शोधावं लागेल"; - काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी

    06-Jun-2024
Total Views |
 adhir ranjan
 
कोलकाता : पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पाच वेळा खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आता त्यांचे राजकीय भवितव्य काय असेल हे मला माहीत नाही. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांचा तृणमूलचे उमेदवार आणि माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी ८५,००० हून अधिक मतांनी पराभव केला.
 
बहरामपूर येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ६८ वर्षीय चौधरी म्हणाले की, मला भीती वाटते की येणारा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण जाईल. बंगालमधील या (तृणमूल) सरकारशी लढण्याच्या प्रयत्नात मी माझ्या उत्पन्नाच्या स्रोतांकडे दुर्लक्ष केले आहे. मी स्वतःला बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) खासदार म्हणवतो. माझ्याकडे राजकारणाशिवाय दुसरे कोणतेही कौशल्य नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत माझ्यासाठी अडचणी निर्माण होणार असून त्यावर मात कशी करावी हे मला माहीत नाही.
 
अधीर रंजन म्हणाले, “मी लवकरच माझे खासदार निवास रिकामे करण्यासाठी दिल्लीला जाणार आहे. माझी मुलगी शिकत आहे. ती कधीकधी तिच्या अभ्यासासाठी या जागेचा वापर करते. मला आता तिथे नवीन घर शोधावे लागेल, कारण माझ्याकडे एकही घर नाही. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यावर बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, "मी निवडणुकीत माझा पराभव मान्य केला आहे. या पदासाठी माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती शोधण्याची विनंती पक्षप्रमुखांना केल्याने मला आधीच प्रदेशाध्यक्षपद सोडायचे होते. सोनिया गांधींच्या विनंतीनुसार मी थांबलो."