क्लाऊडिया मेक्सिकोला तारणार?

    06-Jun-2024   
Total Views |
Claudia Sheinbaum
पाश्चात्त्य देश म्हंटले की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य समता वगैरे वगैरे संकल्पना लोकांच्या डोळ्यासमोर आजही येतात. मात्र, मध्य अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये तर १९५३ साली महिलांना पहिल्यांदा मतदानाची संधी मिळाली आणि या देशाला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळण्यासाठी २०२४ साल उजाडावे लागले. आजही दर दिवशी मेक्सिकोमध्ये दहा महिलांचा खून होतो आणि वर्षाला हजारो महिला बेपत्ता होतात. त्या मेक्सिकोमध्ये जन्माने ज्यू असलेल्या क्लाऊडिया शीनबाम राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या. अर्थात, याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले नसते तर नवल. क्लाऊडिया या योजना-नियोजनात प्रवीण आहेत. जागतिक तापमान वाढीसंदर्भातील कामासाठी २००७ साली त्यांना संयुक्त राष्ट्रातर्फे ‘नोबेल’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
 
 २००० साली त्या मेक्सिको शहराच्या पर्यावरण मंत्री होत्या. तसेच २०१८ ते २०२३ पर्यंत शहराचे महापौरपदही त्यांनी भूषविले होते. मेक्सिकोच्या यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे क्लाऊडिया यांच्यासमोरील उमेदवारसुद्धा जोचिटल गैल्वेज़ रुइज़ ही महिलाच होती. २०१८ साली जोचिटल या मिगुएल हिडाल्गो या शहराच्या महापौर होत्या. देशात कायदा-सुव्यवस्था कडक असावी, यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यू धर्मीय क्लाऊडिया या बहुसंख्य रोमन कॅथलिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या. क्लाऊडिया यांनी कधीही ज्यू धर्माबद्दल किंवा इस्रायलबद्दल मतप्रदर्शन केलेले नाही. आपण कट्टर धर्मनिरपेक्ष मेक्सिकन आहोत, असे त्यांचे म्हणणे. त्या धर्मनिरपेक्ष आहेत की नाही माहित नाही. मात्र, चांगल्या राजकारणी नक्कीच आहेत. कारण, मागे एका जनसभेमध्ये त्या कॅथलिक घालतात ती ‘रोझरी’ आणि मेक्सिकोमधील ख्रिस्ती लोकांचा पारंपरिक पोषाख ‘हुयपिल’ परिधान करुन गेल्या. यावर मेक्सिकोचे माजी राष्ट्राध्यक्ष व्हिनसेंट फॉक्स लेड म्हणाले की, ”ही महिला ‘फेक’ आहे. ती ज्युईश आहे.

मात्र, ख्रिस्ती असल्याचा देखावा करत आहे. ही स्वत:च्या धर्मतत्वांशी प्रामाणिक नाही तिच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या?” अर्थात, हे असे राजकारण जगभर चालतेच म्हणा. आपणही भारतात राहुल गांधींना रोझरी, टोपी आणि जानवं टप्प्याटप्प्याने घालून मत मागताना पाहिलेच की!तर मेक्सिकोमध्ये राष्टाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कधी नव्हे ते दोन महिलांमध्ये चुरस रंगली. त्यातून शेवटी क्लाऊडिया यांची सरशी झाली. जनतेने महिला उमेदवारांनाच का समर्थन दिले, तर त्यमागील कारण म्हणजे मेक्सिकोमध्ये बोकाळलेली गुन्हेगारी. मेक्सिकोमध्ये नशेचा व्यापार करणारे १५० गट आहेत, त्यांना ‘कार्टेल’ असे म्हंटले जाते. दरवर्षी हे ‘कार्टेल’ अडीच हजार कोटींचा नशेचा व्यापार करतात, असा अंदाज आहे. यातील बहुतेक ‘कार्टेल’कडे स्वत:ची सशस्त्र सेनादेखील आहे. अमेरिकेतील सैन्याकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रे यांच्याकडे आहेत, असे मागे मेक्सिको सरकारनेच म्हटले होते. मेक्सिको सरकारने अमेरिकेच्या शस्त्रास्त्र बनवणार्‍या कंपन्यांनाच कोर्टात खेचले होते. मेक्सिकन सरकारचे म्हणणे होते की, “अमेरिकेच्या कंपन्या मेक्सिकोमध्ये शस्त्र विकतात. त्यामुळे मेक्सिकोमध्ये हिंसा होते.

गेल्या एका दशकात चार लाख लोक या शस्त्रांनी मारले गेले. त्यामुळे अमेरिकेने मेक्सिकोला याची भरपाई द्यावी.” ‘सिनालोआ’, ‘गल्फ कार्टेल’, ‘लॉस जीटास कार्टेल’, ‘जुआरेज कार्टेल’, ‘जेलिस्को कार्टेल’ आणि ‘बर्तन लेव्लया कार्टेल’ या मेक्सिकोमधील काही प्रमुख अपराधी संघटना आहेत. यापैकी ‘लॉस जीटास कार्टेल’ तर सैन्यातील पळून गेलेले अधिकारी आणि पोलीस यांनी उभी राहिलेली संघटना. इथले राजकारणही या ‘कार्टेल’च्या हुकमतीवर आणि पैशावर चालते, असे म्हटले जाते. एखादा नेता ‘कार्टेल’च्या विरोधात गेला की त्याची हत्या होते. ही निवडणूक सुरू असताना तब्बल ३७ राजकीय नेत्यांच्या हत्या झाल्या. यावरून मेक्सिकोमध्ये राजकारणात टिकून राहणे म्हणजे काय, याची स्पष्टता येते. या अशा परिस्थितीमध्ये मेक्सिकन जनतेने क्लाऊडिया यांना पसंती दिली. कारण, आतापर्यंत क्लाऊडिया यांचे नाव कोणत्याही ‘कार्टेल’सोबत जोडले गेले नाही. या पार्श्वभूमीवर संघटित गुन्हेगारीसाठी, महिलांवरील अत्याचाराबाबत कुप्रसिद्ध असलेल्या मेक्सिकोची प्रतिमा बदलण्यासाठी क्लाऊडियांना काम करावे लागेल. बाकी ज्यू महिला देशाची राष्ट्राध्यक्ष झाली, म्हणून ‘सेव्ह गाझा’, ‘ऑल आईज ऑन राफा’वाले तिथेही सतर्क झालेत. त्यामुळे क्लाऊडिया यांची कारकीर्द संघर्षात्मक असणारच यात शंका नाही.

 

 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.