यंदा १८ राज्यमंत्री तर ४ केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का!

    05-Jun-2024
Total Views |
modi-government-ministers-election-loss


नवी दिल्ली :
      यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील तब्बल १८ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभव झालेल्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय कॅबिनेटमधील एकूण ४ तर १४ केंद्रीय राज्यमंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, पराभव झालेल्या मंत्र्यांमध्ये स्मृती इराणी ते अर्जुन मुंडा यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी यांचा मेरठमधून काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांच्याकडून पराभव झाला. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री संजीव सिंह बल्यान यांनाही उत्तर प्रदेशात पराभवाचा सामना करावा लागला. मोदी सरकारमधील मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रीपद त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील मेरठ व मुझफ्फरनगर मतदारसंघातून भाजपला पराभव स्वीकारवा लागला आहे.


महाराष्ट्रात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राज्यमंत्री कपिल पाटील यांचा शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांनी पराभव केला. त्याचबरोबर, जालनामधून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचादेखील पराभव झाला आहे. काँग्रेसचे कल्याण काळे यांनी दानवे यांचा पराभव करत भाजपला धक्का दिला आहे.

दरम्यान, दक्षिण भारतात भाजपला मोठा फटका बसला असून केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांचाही तामिळनाडूमधील निलगिरी मतदारसंघातून द्रमुकच्या ए राजा यांनी पराभव केला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी कल्याण आणि एसटी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा हे देखील झारखंडमधील खुंटी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरले असून काँग्रेसच्या कालीचरण मुंडा यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला आहे.