‘रालोआ’ नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड; लवकरच शपथविधी!

    05-Jun-2024
Total Views |
nda leader narendra modi


नवी दिल्ली :       भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ‘रालोआ’ अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर दि. ७ जून रोजी ‘रालोआ’तर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ‘रालोआ’स स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. त्यानंतर सत्तास्थापनेची तयारी सुरू झाली असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७, लोककल्याम मार्ग या निवासस्थानी ‘रालोआ’ घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीत ‘रालोआ’ घटकपक्षांनी एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला असून उद्या म्हणजे ७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रालोआ’च्या बैठकीत तेलुगू देशमचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांनी आपापल्या मागण्या ठेवल्याचे समजते. कोणत्या पक्षास किती मंत्रिपदे मिळणार, याविषयी अद्याप कोणताही घोषणा झाली नसून त्यासाठी चर्चेच्या काही फेऱ्या होणे अपेक्षित आहे. ‘रालोआ’तील लहान घटकपक्षांनाही योग्य ते स्थान देण्यात येईल, याची ग्वाही भाजपतर्फे देण्यात आल्याचेही समजते.


अशी आहे ‘रालोआ’

‘रालोआ’च्या बैठकीस भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह उपस्थित होते. तेलुगू देशमचे चंद्राबाबू नायडू, जदयुचे नितीश कुमार, राजीव रंजन सिंह आणि संजय झा, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, जनता दल सेक्युलरचे एच. डी. कुमारस्वामी, लोकजनशक्ती पार्टीचे (रामविलास) चिराग पासवान, हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जितनराम मांझी, जनसेना पार्टीचे पवन कल्याण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, युनायटेड पीपल्स पार्टीचे प्रमोद बोडो, आसाम गण परिषदेचे अतुल बोरा, सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे इंद्रा हंग सुब्बा, ऑल झारखंड स्टुडंट युनियनचे सुदेश महतो आदी पक्ष आणि नेत्यांचा ‘रालोआ’मध्ये समावेश आहे.


शिवसेनेसाठी अतिशय आनंदाचा क्षण - एकनाथ शिंदे, (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)
 
शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींब्याचे पत्र दिले आहे. भाजप आणि शिवसेना ही वैचारिक युती असून सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे हे आमच्यासाठी अतिशय आनंदाचे आहे. गेल्या दहा वर्षांत देशाची चौफेर प्रगती झाली असून पुढील पाच वर्षांच्या काळात भारताचा विकास नव्या उंचीवर पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचाही विकास होईलच, अशी खात्री आहे. ‘रालोआ’ची बैठक अतिशय सकारात्मक वातावरणात पार पडली असून सर्वच पक्ष पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.