देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहून संघटनेचे काम करावे

चंद्रशेखर बावनकुळे; भाजपच्या सर्व सदस्यांच्या वतीने केली विनंती

    05-Jun-2024
Total Views |
bjp maharashtra
 

मुंबई :    "देवेंद्र फडणवीस हे नेहमी संघटनेच्या कामावर भर देतात. पूर्णवेळ संघटनेत काम करण्यासाठी त्यांनी सरकारबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. सरकारमध्ये राहून संघटनेचे काम करावे", अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या सर्व सदस्यांच्या वतीने केली.

लोकसभेच्या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णवेळ संघटनेच्या कामासाठी सत्तापद सोडण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांना सत्तेबाहेर न जाण्याची विनंती केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतर बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. अपयशाचे चिंतन केले. आगामी निवडणुकांसाठी आम्ही एक रोडमॅप तयार करणार आहोत.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळे करण्यासंदर्भात विधान केले. मात्र, त्यांनी त्यांची ती भावना व्यक्त केली आहे. फडणवीस हे नेहमी संघटनेच्या कामावर भर देतात. मात्र, पूर्णवेळ संघटनेचे काम करण्यासाठी सरकारबाहेर येऊन काम करण्याची आवश्यता नाही. सरकारमध्ये राहूनही संघटनेचं काम करता येते. आम्ही भाजपाचे सर्व सदस्य त्यांना विनंती करीत आहोत की, सरकारमध्ये काम करुनही संघटनेला चार दिवस देता येतात.

आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होईल. पक्षाची संघटना आणि सरकारमध्ये समन्वयाची भूमिका ठेवून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला पुढे घेऊन जावे. लोकसभेचा निकाल लागला. त्यामध्ये जागा कमी आल्या. त्यामुळे त्यांच्या मनात दु:ख आहे. त्यामधून त्यांनी व्यक्त केलेली ती भावना आहे”, असे बावनकुळे यांनी सांगितले.


फडणवीस आमचा निर्णय मान्य करतील

देवेंद्र फडणवीस हे आमच्या कोअर कमिटीच्या सदस्यांचा निर्णय मान्य करतील, असा विश्वास आहे. खरे तर महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा आल्यामुळे आम्हालाही दु:ख आहे. ही जाबाबदारी फक्त देवेंद्र फडणवीसांची नाही, तर ती सर्वांची आहे. आम्ही सर्वजण फडणवीस यांच्याबरोबर आहोत, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.