‘अष्टलक्ष्मी’चा आशीर्वाद भाजपलाच!

    05-Jun-2024   
Total Views |
BJP's victory in North East India
2024च्या लोकसभा निवडणूक निकालात भाजप अनपेक्षितरित्या बहुमतापासून दूर राहिला. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या उत्तर प्रदेशमध्ये भाजपची पीछेहाट झाली. पण, याउलट भाजपने ईशान्य भारतातील आठ राज्यांतील 25 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. कधीकाळी ईशान्य भारतात अस्तित्वहीन असलेल्या भाजपसाठी ही कामगिरी सुखावणारीच म्हणावी लागेल.

मुख्य प्रवाहातील भारतीय माध्यमं ईशान्य भारताकडे दुर्लक्ष करतात, हा आरोप कायमच केला जातो आणि या आरोपांमध्ये काही प्रमाणात तथ्यही आहेच. ईशान्य भारतातील छोटी-छोटी राज्ये, लोकसभेच्या दृष्टीने कमी असलेले संख्याबळ यामुळे राष्ट्रीय राजकारणात ईशान्य भारताची म्हणावी तशी चर्चा गेली कित्येक वर्षं होत नव्हती. 2014 पूर्वी या भागाकडे सरकारी पातळीवरसुद्धा सर्वांगीण दुर्लक्षच वाट्याला आले. त्यामुळेच ईशान्य भारतात बेकायदेशीर धर्मांतरण, परदेशी ताकदींचा हस्तक्षेप वाढला अन् यातूनच या भागात अंतर्गत अशांततेला खतपाणी घातले गेले. पण, मागील एक दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ सरकारने ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले. त्यासोबतचं पायाभूत सुविधांच्या विकासामुळे हा भाग देशाच्या इतर भागांसोबत जोडला गेला. त्याचेच परिणाम आता, ईशान्य भारतातील राजकारणावरही प्रकर्षाने उमटलेले दिसतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या हिंदी पट्ट्यात पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसताना, ईशान्य भारतात भाजपने चांगली कामगिरी केली. एवढेच नाही, तर भाजपने अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा एकहाती वर्चस्व निर्माण केले.
जेथे सूर्य सर्वप्रथम उगवतो ते भारतातील ठिकाण असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच यावेळी विधानसभेच्या निवडणुकादेखील पार पडल्या. दि. 2 जूनला अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. अरुणाचलच्या विधानसभेच्या 60 जागांपैकी 46 जागांवर भाजपने विजय मिळवता. अरुणाचलमध्ये आपले एकहाती वर्चस्व कायम राखले. विधानसभेप्रमाणेच अरुणाचलमधील दोन लोकसभा जागांवरही भाजपने विजय मिळवला. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नबाम तुकी यांचा एक लाख मताधिक्याने पराभव केला. अरुणाचल प्रदेशप्रमाणे सिक्कीममध्येसुद्धा लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होत्या. सिक्कीममध्ये भाजप आणि काँग्रेसचं राजकीय अस्तित्व नगण्य आहे. सिक्कीममधील लढाई ही ’सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा’ आणि ‘सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट’ यांच्यात होती. या लढाईत प्रेमसिंह तमांग यांच्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने एकहाती बाजी मारली. भाजपला सिक्कीमच्या विधानसभेत खातं उघडता आलं नसलं, तरी पक्षाला एकूण मतांच्या 5.18 टक्के मतं मिळाली. तर, सिक्कीममध्ये काँग्रेसला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. काँग्रेसला सिक्कीममध्ये ’नोटा’पेक्षाही कमी मतदान मिळाले.
ईशान्य भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणजे आसाम. संपूर्ण ईशान्य भारतातील 25 लोकसभेच्या जागांपैकी एकट्या आसाममध्ये 14 जागा आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वात आसाम भाजपचा गड अभेद्य बनला आहे. आसाममध्ये भाजपने यावेळी 14 पैकी नऊ जागांवर विजय मिळवला. 2019 मध्ये भाजपला आसाममध्ये सात जागांवर विजय मिळाला होता. भाजपला यावेळी दोन जागांचा फायदा झाला आहे. बांगलादेशी घुसखोर, ‘सीएए’ कायद्याची अंमलबजावणी यांसारख्या मुद्द्यांवर आसामची निवडणूक यंदा गाजली. एकेकाळी डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपने आपले पुरेपूर राजकीय वर्चस्व या निवडणुकीतही कायम ठेवले. त्रिपुरातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला. त्रिपुरा पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनी विजय मिळवला, तर त्रिपुरा पूर्व लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या कृती देवी देबबर्मन विजयी ठरल्या. 25 वर्षे डाव्यांची सत्ता असलेल्या त्रिपुरात भाजपने 2018 मध्ये ‘कमळ’ फुलवलं होतं. तेव्हापासून भाजपने त्रिपुरात एकहाती वर्चस्व निर्माण केले आहे. भाजपचे हेच वर्चस्व या निवडणूक निकालातूनही दिसून आले.
 
त्रिपुराव्यतिरिक्त मिझोरामच्या एका जागेवर ‘झोराम पीपल्स मूव्हमेंट’ या स्थानिक पक्षाचा विजय झाला, तर मेघालयमधील दोन जागांपैकी एका जागेवर काँग्रेसचा, तर एका जागेवर ‘व्हॉईस ऑफ द पीपल पार्टी’ने विजय मिळवला. त्यासोबतच नागालँडची एक जागाही काँग्रेसने जिंकली. मागच्या काही काळापासून ईशान्य भारतातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले राज्य म्हणजे मणिपूर. मागच्या एक ते दीड वर्षांपासून जातीय हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरमध्ये अद्यापही संपूर्ण शांतता आलेली नाही. मैतेयी आणि कुकी या दोन जातसमूहांमध्ये चालू असलेला हिंसाचार आता थांबला असला तरी, अधून-मधून मणिपूरमधील फुटीरतावादी तत्त्वे डोकं वर काढतात. त्यामुळे मणिपूरचा हिंसाचार थांबवण्यात केंद्र आणि राज्य सरकारांना म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. मणिपूरमधील दोन्ही जागांवर भाजपचा पराभव झाला.
ईशान्य भारतातील ‘अष्टलक्ष्मी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर आणि सिक्कीम. या राज्यांचे सत्तास्थापनेच्या दृष्टीने राष्ट्रीय राजकारणात महत्त्व काही राजकीय पक्षांना आजही वाटत नसले तरी देशाच्या आंतरिक सुरक्षेसाठी ही राज्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. हा भाग चारही बाजूने नेपाळ, बांगलादेश, चीन आणि म्यानमारच्या सीमांनी वेढलेला आहे. त्यात चीन हा आपला पारंपरिक शत्रू. चीन अरुणाचल प्रदेशवर आपला दावाही सांगतो, तर म्यानमारमध्ये सध्या गृहयुद्ध चालू आहे. त्यासोबतच बांगलादेश आणि नेपाळ ही आपली मित्रराष्ट्रं असली तरी, या देशातही मोठ्या प्रमाणावर भारतविरोधी शक्तीचं अस्तित्व आहे. त्यामुळे अशा संवेदनशील राज्यांमध्ये भाजपसारख्या राष्ट्रवादी विचारांच्या पक्षांचा राजकारणावर प्रभाव असणे, देशहिताचेच!

श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.