पौराणिक ग्रंथ, कथांनुसार सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे एकूण चार युग. सध्या कलियुग सुरू असून, पुराणांनुसार या युगाच्या अखेरीस संपूर्ण जीवनसृष्टी नष्ट होणार. भगवान विष्णू दहाव्या अवतारात या कलियुगात जन्म घेऊन वाईटाचा, असत्याचा खात्मा करणार. याच कलियुगावर आधारित दिग्दर्शक नाग अश्विन यांनी ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट भेटीला आणला आहे. दि. 27 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाविषयी....
थोडक्यात, कलियुगाच्या अंताबद्दल सांगायचे झाल्यास ज्यावेळी कलियुग समाप्त होणार असेल, तत्पूर्वी सर्व देवी-देवता पृथ्वी सोडून निघून जातील. परिणामी, मनुष्य पूजन-कर्म आणि सर्व धार्मिक काम करणे बंद करेल. शिवाय कलियुगाच्या अंतिम काळात खूप वर्षे पाऊस पडत राहील, ज्यामुळे दाही दिशांना पाणीच पाणी जमा होईल. संपूर्ण पृथ्वी जलमय होऊन सजीवांचा अंत होईल. त्यानंतर सूर्याची उष्णता इतकी तीव्रतेने वाढेल की, ज्यामुळे पृथ्वी शुष्क पडेल. तसेच, कलियुगात संपूर्ण समाज हा हिंसक होईल, जे लोक बलवान आहेत ते अधिक शक्तिशाली होतील आणि गरीब जनतेचे जगणे अधिक कठीण होऊन बसेल. कलियुगाची ही कुवैशिष्ट्ये सांगण्याचे प्रयोजन म्हणजे, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचे कथानक वर नमूद केलेल्या प्रसंगांवरच आधारीत आहे.
चित्रपटाच्या कथेची सुरुवात होते कुरुक्षेत्रातील युद्धापासून. जिथे भगवान श्रीकृष्ण अश्वत्थाम्याला अमरत्व प्रदान करतात आणि त्यांचे प्रायाश्चित्त म्हणजे, ज्यावेळी कलियुगात पृथ्वीवर पापाचा विस्फोट होईल, तेव्हा दुष्ट शक्तींचा सामना करण्यासाठी विष्णू ‘कल्की’च्या रूपात दहावा अवतार अवतार घेतील. त्यावेळी कल्कीच्या रक्षणाची जबाबदारी ही अश्वत्थामाची असेल. यानंतर हजारो वर्षांचा काळ लोटतो आणि कलियुगाच्या अंतापर्यंत आपण पोहोचलेलो असतो. तेव्हा काशी येथे प्रचंड आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एक मायावी कॉम्पलेक्स उभारलेले दिसते. या उंच इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक वेगळेच विश्व सुप्रीमने (कमल हसन) निर्माण केलेले. जगाचा जरी अंत झाला, तरी सुप्रीमला अमर राहायचे असल्याकारणाने, स्वत:ची दैवी शक्ती वाढवण्यासाठी तरुणींच्या गर्भावर विज्ञानाच्या मदतीने प्रयोग सुरु असतात. प्रयोगशाळेतील एका विशेष प्रयोगाअंती सुमती (दीपिका पादुकोण) गर्भवती राहाते आणि तिच्याच पोटात विष्णूचा दहावा अवतार या जगाला वाचवण्यासाठी नवा जन्म घेण्याच्या तयारीत असतो. भैरवा (प्रभास) याला सुमतीला पकडून सुप्रीमच्या स्वाधीन करण्याची मोठी जबाबदारी दिलेली असते. मात्र, साक्षात देवाला जन्म देणार्या मातेला आणि देवाला वाचवण्यासाठी अश्वत्थामा (अमिताभ बच्चन) येतात. यानंतर सुमतीचे रक्षण करण्यासाठी अश्वत्थामा काय काय करतात? भैरवा आणि अश्वत्थामा यांचा काय संबंध आहे? हे पाहण्यासाठी ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट पाहावा लागेल.
‘कल्की 2898 एडी’च्या कथानकाच्या मांडणीबाबत काहीसा संभ्रम जरुर वाटतो. कारण, घोर काळे कलियुग प्रेक्षकांसमोर उभे करण्यात लेखक आणि दिग्दर्शक कमी पडले आहेत. मुळात या चित्रपटाचे कथानकच हिरो आहे. पण, अमिताभ बच्चन, कमल हसन, दीपिका पादुकोण आणि प्रभास या दिग्गज कलाकारांची झालेली गर्दी यामुळे कुठे तरी मुख्य कथानकच झाकोळून जाते.तसेच, इतक्या मोठ्या कलाकारांचा एकत्रित साचा तयार केल्यानंतर एकाही कलाकाराला योग्य ‘स्क्रीन टाईम’ देण्यात दिग्दर्शकही कुठे तरी मागे पडले आहेत. चित्रपटाचा पूर्वार्ध तसा रटाळवाणाच. कारण, प्रभासच्या भूमिकेचा नेमका उद्देश चित्रपटाच्या उत्तरार्धानंतर साध्य होतो. पण, त्यापूर्वी केवळ तो चित्रपटाचा भाग आहे म्हणून त्याला पडद्यावर दाखवले आहे, असेच काहीसे जाणवते. याशिवाय अभिनेत्री दिशा पटानी हिचा या चित्रपटाशी नेमका संबंध तरी काय, हे देखील कळत नाही. परंतु, एस. एस. राजामौली, दुल्कर सलमान, मृणाल ठाकूर यांची विशेष उपस्थिती चेहर्यावर हसू आणते. ज्यानुसार काही पात्र खरोखरीच प्रेक्षकांशी जोडली जात नाहीत, त्यानुसारच लेखकाला आणि दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे? हाच मुळात मोठा प्रश्न मध्यांतरापूर्वी पडतो. त्यानंतर कथानक मध्यांतरानंतर जसे पुढे सरकते, त्यात केवळ हाणामारीची दृश्ये अधिक दाखवण्यात आले आहे. हे ‘अॅक्शन सीन्स’ सुरू असताना अमिताभ बच्चन यांचे पात्र अर्थात अश्वत्थामा हे किती मोठे आहे, हे त्यांच्या शरीरयष्ठीतून प्रतिबिंबित होते. यासाठी दिग्दर्शकांचे विशेष कौतुक. ‘स्टारडम’च्या नावाखाली जरी दिग्दर्शकाला कुणा एका कलाकाराला पुरेसा न्याय देता आला नसला, तरी केवळ कुणा एका कलाकारालाच मोठे दाखवण्याची चूकदेखील त्यांनी केली नाही, हेही तितकेच अधोरेखित करण्यासारखे.
या चित्रपटात भविष्यातील विश्व मोठ्या पडद्यावर निर्माण केले असून, अर्थातच ते तंत्रज्ञानाच्याही पलीकडील दाखवण्याचा चांगला प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. युपीआय अॅप्सची जागा युनिट्सने घेतली आहे. बंदूक किंवा हत्यारांची जागा आधुनिक हत्यारांनी घेतलेली. बरं, मुळात हा दाक्षिणात्य चित्रपट असल्यामुळे सेटची भव्यता ही पटणारी असून, उगाच प्रेमकथा किंवा कोणतेच अन्य अनावश्यक कथानक दाखवण्यात आलेले नाही, याचेही समाधान वाटते. जर का कलाकारांची कमी गर्दी, कथानकाची मोजकी आणि उत्तम मांडणी केली असती , तर ‘कल्की 2898 एडी’ ज्याप्रमाणे प्रदर्शनापूर्वी भव्यदिव्य आहे, असे हे दाखवण्यात आले होते, ते खरे ठरले असते. याशिवाय चित्रपटाचे पार्श्वसंगीत कथेला फारसे साथ देत नाही. प्रसंगानुरुप पार्श्वसंगीत अपेक्षित असून, त्याबाबतीत मात्र प्रचंड निराशा पदरी पडते. परंतु, वेशभूषा, केशभूषा, आर्ट डिपार्टमेन्ट यांनी त्यांचे काम अगदी चोख बजावले आहे, हे विशेषत्वाने नमूद करायलाच हवे.
दिग्दर्शन, कथा, संगीत यानंतर वळूयात अभिनयाकडे. प्रभासकडे पाहिल्यावर आपसुकच त्याच्या ‘बाहुबली’, ‘सलार’ या चित्रपटातील भरभक्कम भूमिका आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. परंतु, या चित्रपटात प्रभासने अभिनयाच्या बाबतीत प्रेक्षकांची काहीशी निराशाच केल्याचे दिसते, तर दीपिका पादुकोणने तिच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. कमल हसन यांचा ‘स्क्रिन टाईम’ अगदी हातावर मोजण्याइतका असल्यामुळे त्यांची भूमिका काहीशी नजरेआड होते. पण, दिग्गज कलाकार काय असतो किंवा मातीत मुरलेला नट म्हणजे काय, याची प्रचीती त्यांच्या अभियनातून नक्कीच येते. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तर काही बोलणेच अनुचित. मुळात अश्वत्थामाच्या भूमिकेला त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणताच कलाकार न्याय देऊ शकला नसता, असे प्रामाणिकपणे वाटते. 50-60 वर्षांपेक्षा अधिक अभिनय क्षेत्राचा अनुभव गाठीशी असलेल्या अमिताभ बच्चन यांनी सगळ्यांनाच या चित्रपटात मागे टाकले, हे अगदी ठामपणे म्हणावे लागेल.
‘कल्की 2898 एडी’च्या बाबतीत आणखीन एक बाब प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती अशी की, महाभारत घडलेल्या कुरुक्षेत्र युद्धापासून चित्रपटाच्या कथानकाची सुरुवात होते. आजच्या तरुण पिढीला महाभारत किंवा त्यातील व्यक्तिरेखा माहित असतीलच असे नाही. त्यामुळे काही अंशी ती पार्श्वभूमी काहीशी खोलात जाऊन दिग्दर्शकाने मांडली असती, तर काही संदर्भ पटकन लक्षात आले असते. आणि दुसरी बाब म्हणजे, ‘कटप्पाने बाहुबली को क्यू मारा’ असा मोठा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित करत, जसा ‘बाहुबली 1’ संपवला, त्याच पठडीत कल्कीचा जन्म कधी होणार? ती भूमिका कोण साकारणार? हे जग वाचवण्यासाठी सात चिरंजीवी एकत्र येणार, असे सांगण्यात आले आहे. त्याचाही ‘कल्की 2’ मध्ये समावेश असणार का? आणि सुप्रीम, अश्वत्थामा आणि भैरवा यांच्यात काय होणार? असे अनेक प्रश्न ‘कल्की 2898’ एडी उपस्थित करून गेला आहे.
रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.