नितीश कुमारांनी दिल्लीत घेतला मोठा निर्णय!

29 Jun 2024 17:21:21
janata dal united meeting take decision
 

नवी दिल्ली :       जनता दल युनायटेडच्या (जदयु) कार्याध्यक्षपदी संजय झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या जदयु राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संजय झा यांना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मांडला. त्यानंतर एकमताने हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे.




बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेडीयूच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जेडीयूच्या बैठकीत झारखंड विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणे, आरक्षणाची मर्यादा वाढवणे, बिहारला विशेष पॅकेज देणे किंवा विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नीट पेपर प्रकरणातील गैरप्रकारांची चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री नितीश कुमार बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्ष भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचीही भेट घेणार असल्याचेही समजते.

दरम्यान, संजय कुमार झा हे नितीश कुमार यांचे खास आणि जवळचे नेते मानले जातात. त्यांनी बिहार सरकारमध्ये जलसंपदा आणि माहिती आणि जनसंपर्क खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. ते बिहार विधान परिषदेचे सदस्यही होते. फेब्रुवारी 2024 मध्ये, त्यांची बिहारमधील बशिष्ठ नारायण सिंह यांच्या जागी जदयुकडून राज्यसभेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.




Powered By Sangraha 9.0