तामिळनाडूतील विषारी दारू मृत्यूकांडाविषयी काँग्रेसचे मौन संतापजनक

24 Jun 2024 18:30:49
tamilnadu toxic liquor
 

नवी दिल्ली :     तामिळनाडूमध्ये विषारी दारूच्या प्राशनाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सत्ताधारी द्रमुकसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही मौन चिंताजनक आहे, असे पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिले आहे. तामिळनाडूतील विषारी दारूची दुर्घटना पूर्णपणे मानवनिर्मित आहे. द्रमुकसह विरोधी पक्षांचे आघाडी सरकार आणि अवैध दारू माफिया यांच्यात साखळी नसती तर कदाचित ५६ लोकांचे प्राण वाचू शकले असते. तामिळनाडूतील दुर्घटनेनंतर कल्लाकुरिचीच्या करुणापुरम गावात दिसणारे जळणाऱ्या चितांच्या दृश्याने संपूर्ण देशाचा विवेक हादरवून सोडला आहे.


करुणापुरममध्ये मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती समुदायातील लोकसंख्या आहे. राज्य सरकारच्या धोरणांमुळे त्यांना गरिबी आणि भेदभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली असताना तुमच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने मौन का धारण केले आहे, असा सवाल ऩड्डा यांनी विचारला आहे.

अनुसूचित जाती व जमातींविषयीच्या मुद्द्यांवर पक्षीय मतभेद विसरण्याची गरज असल्याचे नड्डा यांनी पत्रात नमूद केले आहे. ते पुढे म्हणाले, तामिळनाडूच्या द्रमुक – इंडी आघाडी सरकारने सीबीआय चौकशीची मागणी करण्याची आणि उत्पादन शुल्क मंत्री एस. मुथुसामी यांना त्यांच्या पदावरून त्वरित हटविण्याची गरज आहे. पीडितांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी भरपाईची रक्कम योग्य पातळीवर वाढवण्यात यावी, जेणेकरून या कुटुंबांना पुरेसा आधार मिळू शकेल.

न्यायाच्या बाबतीत काँग्रेसने ज्या घोषणा केल्या होत्या, त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. तामिळनाडूतील लोक आणि संपूर्ण अनुसूचित जाती समुदाय काँग्रेस पक्ष व विशेषतः राहुल गांधी आणि भारतीय आघाडीच्या नेत्यांचा दुटप्पीपणा पाहत आहेत, असाही टोला नड्डा यांनी पत्रात लगावला आहे.


राहुल गांधींनी उपदेश देऊ नये

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरही नड्डा यांनी टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, संविधानाबद्दल आणि अनुसूचित जाती व जमाती समाजाचे कल्याण आणि हक्क सुनिश्चित करण्याबद्दल राहुल गांधी अचानक शांत झाले आहेत. मात्र, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मौन बाळगण्याऐवजी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी. किमान या प्रश्नावर आवाज उठवण्याची हिंमत दाखवावी, अन्यथा केवळ पोकळ उपदेश देऊ नये; नड्डा यांनी म्हटले आहे.




Powered By Sangraha 9.0