शरद पवारांनी घेतला लोकसभेचा धसका; थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहित दिला इशारा!

    24-Jun-2024
Total Views |
sharad pawar group eci letter


नवी दिल्ली :   
   राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गटा)ने पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत एका जागेवर बसलेला फटका लक्षात घेता पक्षाने आयोगात घेतलेली धाव महत्त्वाची ठरत आहे. पक्षाकडून केंदीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले असून पिपाणी चिन्हामुळे निवडणुकीत झालेले नुकसान टाळण्याकरिता नवे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत साताऱ्याची जागा पक्षाने  आघाडीवर असतानाही गमावली. 

दरम्यान, लोकसभा निवडणूक २०२४ करिता राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गटा)ला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. पक्षाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार अपक्ष उमेदवारांना 'पिपाणी' या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती आयोगाला करण्यात आली आहे.


पक्षाने लोकसभा निवडणूक ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली होती. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं असा दावा गटाकडून करण्यात आला आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार होती मात्र ‘पिपाणी’ चिन्हामुळे ती जागा हातातून गेली, असेही शरद पवार गटाने म्हटले आहे.

शरद पवार गटाचे निवडणूक चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेले निवडणूक चिन्ह ‘पिपाणी’ या दोन्ही चिन्हांमध्ये साधर्म्य आहे. या साधर्म्यामुळे मतदारांना चिन्हातील फरक लवकर लक्षात येत नाही. विशेष म्हणजे यामुळे पक्षाचे नुकसान होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून शरद पवार गटाने यासंदर्भात पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे.