नवी दिल्ली : सौदी अरेबिया येथे दरवर्षी हज यात्रेनिमित्त मुस्लिम धर्मीय एकत्र येतात. यंदा हजयात्रेदरम्यान अनेक यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यु झाल्याची घटना समोर आली. विशेष म्हणजे या यात्रेदरम्यान उष्माघाताने मृत पावलेल्या यात्रेकरूंची संख्या १३०० हून अधिक असल्याची माहिती मिळत आहे. पुरेसा निवारा किंवा आराम नसताना थेट उन्हात लांब अंतर चालल्यामुळे उष्माघाताचे बळी गेले आहेत. असा अहवाल सौदी प्रेस एजन्सीने दिला आहे.
हज यात्रेकरिता सौदीत आलेल्या एकूण यात्रेकरुंपैकी ८३ टक्के व्यक्ती अनधिकृत किंवा नोंदणी न केलेले आहेत अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यंदा यात्रेवेळी उष्माघाताचा त्रास होऊन १,३०० हून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. हजयात्रेत काहीजणांना हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता नेण्यास रुग्णवाहिका नसल्याचेही सोशल मीडियातून निदर्शनास आले होते.
स्थानिक वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सौदी अरेबिया सरकारमधील आरोग्य मंत्री फहद अल-जलाजेल यांनी या वर्षीच्या हजचे व्यवस्थापन "यशस्वी" असल्याचे वर्णन केले होते. तसेच, आरोग्य यंत्रणेने ४६५,००० पेक्षा जास्त विशेष उपचार सेवा प्रदान केल्या आहेत ज्यात १४१,००० सेवांचा समावेश आहे, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे. दरम्यान, यात्रेवेळी उष्माघातामुळे किती मृत्यू झाले हे मंत्री जलाजेल यांनी स्पष्ट केले नाही.