पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याला जामीन मंजूर झाला आहे. परंतू, त्याची सुटका झाली नसून अन्य दोन गुन्ह्यंमध्ये पुन्हा त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे विशाल अग्रवालचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालने मद्यप्राशन करून कार चालवली आणि दोघांना चिरडले. याप्रकरणात त्याचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपी वेदांतची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - अटल सेतूबाबतच्या अफवांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
दरम्यान, विशाल अग्रवालवर अल्पवयीन मुलाला कार चालवायला देणे, ब्लड सँपलमध्ये फेरफार करणे आणि कार चालकाला धमकावणे असे तीन गुन्हे दाखल आहेत. यापैकी एका गुन्ह्यात शुक्रवारी त्याला विशेष न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल असल्याने त्याची सुटका झाली नसून तो न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच याप्रकरणातील आरोपी कोझी आणि ब्लॅक पबचे मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.