मुंबई : अटल सेतूला कोणताही धोका नसून कुठेही भेगा पडलेल्या नाहीत. देशातील जनताच काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पराभव करेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेस खोट्या चर्चा करत असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसने अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू पुलावर काँक्रीटला तडा गेल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर जात पाहणी केली आणि अटल सेतूलाच तडे गेल्याची अफवा पसरवली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावर स्पष्टीकरण दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अटल सेतूला कोणतीही दरार नाही. तसेच अटल सेतूला कोणताही धोका नाही. हे चित्र अप्रोच रोडचे आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, काँग्रेस पक्षाने खोट्याचा आधार घेऊन 'दरार' निर्माण करण्याची लांबलचक योजना आखली आहे. निवडणुकीच्या वेळी संविधान बदलण्याच्या चर्चा, निवडणुकीनंतर फोनवरून ईव्हीएम अनलॉक आणि आता अशा खोट्या चर्चा ते करत आहेत. देशातील जनताच त्यांच्या या ‘तडा’ योजनेला आणि काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पराभव करेल," असे ते म्हणाले.