कावळ्याच्या शापाने गाई मरतात का? भुजबळांचा जरांगेंना टोला

22 Jun 2024 16:46:57
 
Bhujbal & Jarange
 
छत्रपती संभाजीनगर : कावळ्याच्या शापाने गाई मरतात का? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना केला आहे. मनोज जरांगेनी भुजबळांचं राजकीय करियर उध्वस्त करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. यावर भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
 
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी उपोषण करत असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना शनिवारी छगन भुजबळांसह राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या भेटीआधी छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
हे वाचलंत का? -  ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं उपोषण मागे!
 
छगन भुजबळ म्हणाले की, "काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, सर्व कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख यांची बैठक झाली. यात ओबीसी समाजाच्या काही मागण्या सरकारने मागण्या मान्य केल्या आणि काही मागण्या या अधिवेशन काळात ताबडतोब बैठक घेऊन सर्वपक्षीय लोकांना बोलवून निर्णय घेण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे."
 
जरांगेनी केलेल्या टीकेवर बोलताना ते पुढे म्हणाले की, "माझं राजकीय करियर उद्धवस्त करणं जनता जनार्दनाच्या हातात आहे. ते कुठल्याही एका व्यक्तीच्या हातात नाही. कावळ्याच्या शापाने गाई मरतात का? असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाकेंनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0