जालना : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी सुरु असलेलं उपोषण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मागे घेतलं आहे. गेल्या १० दिवसांपासून लक्ष्मण हाके उपोषणावर बसले होते. अखेर शनिवारी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला त्यांचं उपोषण मागे घेण्यात यश आलं आहे.
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं वडीगोद्री येथे उपोषण सुरु होतं. शुक्रवारी राज्य सरकारची ओबीसी शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. त्यानंतर आज हे शिष्टमंडळ उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांच्या भेटीला दाखल झालं होतं. या शिष्टमंडळात मंत्री गिरीष महाजन, छगन भुजबळ, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे पाच मंत्री तर गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते आहेत.
उपोषण सोडल्यानंतर माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, "सगे सोयऱ्यांचा अध्यादेश येण्याआधी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. ती बैठक झाल्याशिवाय आम्ही अध्यादेश काढणार नाही, असा शब्द शासनाने आम्हाला दिला आहे. तसेच बोगस कुणबी सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे यांच्यावर आम्ही कारवाई करु असंही आम्हाला सरकारने सांगितलं आहे. आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे थांबवलं नाही. बोगस सर्टिफिकेट वाटप करण्याबाबत आमच्या हरकती आहे. जोपर्यंत त्या हरकतींची श्वेतपत्रिका आमच्यासमोर सादर करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल," असे ते म्हणाले.