नागपूर : महाविकास आघाडीत ३ दिवसांत ५ मुख्यमंत्री तयार झाले असून त्यांचे बॅनरही लागले आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधींवरही निशाणा साधला. त्यांनी बुधवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
महायूतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत. सध्या महाराष्ट्रात महायूतीचं सरकार आहे. महायूतीत कोण मुख्यमंत्री असेल यावर आज चर्चा नाही. महायूतीतील सर्व नेते बसून यावर निर्णय घेतील. मात्र, महाविकास आघाडीत तीन दिवसांत पाच मुख्यमंत्री तयार झाले आहेत. नाना पटोले, सुप्रिया सुळे, रोहित पवार, विजय वडेट्टीवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सहा लोकांचे मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लागले आहेत. पंढपूरच्या वारीमध्ये त्यांचे बोर्ड लागलेले आहेत. पण आमच्यात असं काहीही नाही. आम्ही महाराष्ट्रासाठी काम करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण बनणार यापेक्षा १४ कोटी जनतेच्या विकासासाठी काय करता येईल हे महत्वाचं आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "नाना पटोलेंची मानसिकता इंग्रजांची..."; बावनकुळेंचा घणाघात
ते पुढे म्हणाले की, विरोधकांना महाराष्ट्राच्या जनतेचं काहीही पडलेलं नाही. सकाळी झोपून उठल्यापासून तर झोपेपर्यंत टीका करणे एवढंच त्यांचं काम आहे. महायूती विकासाच्या कामावर मत मागणार आहे आणि महाविकास आघाडी खोटं बोलून मत मागणार आहेत. लोकसभेत राहूल गांधींनी महिलांना प्रत्येक महिन्याला साडे आठ हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता ते कुठे गेलेत? त्यांनी संविधान बदलणार आहे, असा खोटा प्रचार करुन मत घेतले. त्यामुळे अशा खोटारड्या लोकांना महाराष्ट्र माफ करणार नाही," असेही ते म्हणाले.