"नाना पटोलेंची मानसिकता इंग्रजांची..."; बावनकुळेंचा घणाघात

    19-Jun-2024
Total Views |
 
Patole & Bawankule
 
नागपूर : नाना पटोलेंची इंग्रजांची मानसिकता झाली असून त्यांनी आत्मपरिक्षण करायला हवं, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. एक कार्यकर्ता नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय धुतानाचा व्हिडीओ मंगळवारी माध्यमांवर व्हायरल झाला होता. यावरून आता बावनकुळेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "नाना पटोले खालच्या पातळीवर गेले आहेत. त्यांनी शेतकऱ्याकडून पाय धुवून घेण्याचा महाराष्ट्राला अशोभनीय प्रकार केला आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा देशात इंग्रजांच्या काळ आणलेला आहे. नाना पटोलेंनी इंग्रजांच्या काळातील मानसिकता स्विकारल्याने मी त्यांचा निषेध करतो. नाना पटोलेंनी आपल्या पदाचा आणि स्वत:चाही अपमान केला आहे. कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणं शोभणारं नाही. त्यामुळे त्यांनी आत्मपरिक्षण करायला हवं," असे ते म्हणाले.
 
भाजपकडून धन्यवाद यात्रा काढण्यात येणार!
 
लवकरच राज्यात भाजपकडून धन्यवाद यात्रा काढण्यात येणार असून या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या २८८ विधानसभांमध्ये आमचे ४८ नेते वेगवेगळ्या लोकसभेत दौरा करणार आहेत. लोकसभेत जिथे आम्ही कमी पडलो तिथे पुन्हा आमचं संघटन वाढवून विधानसभेची तयारी करत आहोत. देवेंद्रजींनी सरकारमध्ये राहूनच भाजपच्या संघटनेला मदत करावी, अशी विनंती आम्ही केली असून त्यांनी ती मान्य केली आहे," असेही बावनकुळेंनी यावेळी सांगितले.